Latest

Manohar Joshi Passes Away: शिवसेनेचा ‘कोहिनूर’ अनंतात विलीन; मनोहर जोशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबईमधील दादर स्मशानभूमीत आज (दि.२३) सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक पक्षांचे राजकीय नेते शिवसेना कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Manohar Joshi Passes Away)

शिवसेनेचा 'कोहिनूर' हरपला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे शुक्रवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते

मनोहर जोशी यांना याआधी म्हणजेच २४ मे २०२३ रोजी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता परत एकदा त्यांना रूग्णलयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी तीन वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल केले होते अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पार्थिव आज (दि.२३) सकाळी ११ ते २ या वेळेत माटुंगा पश्चिम येथील रुपारेल कॉलेज येथील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT