Latest

Baba Ramdev: बाबा रामदेव यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार करणाऱ्यांना खटल्यात पक्षकार करा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळात योगगुरू बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथिक औषधींच्या वापराबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल बिहारच्या पाटणा आणि छत्तीसगडच्या रायपूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए ) शाखेने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. या लोकांना सध्या सुरु असलेल्या खटल्यामध्ये पक्षकार म्हणून सामील करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.१९) दिले. (Baba Ramdev)

ऍलोपॅथी औषधींबाबत केलेल्या कथित वादग्रस्त विधानाबद्दल आपल्याविरुद्ध आयएमए संघटनेने पाटणा आणि रायपूर येथे दाखल केलेल्या फौजदारी गुन्ह्यांच्या कारवाईला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार करणाऱ्या आयएमएच्या दोन्ही शाखांना या खटल्यात पक्षकार बनविण्याचे निर्देश दिले. (Baba Ramdev)

बाबा रामदेव यांनी आपल्या याचिकेत केंद्रसरकार, बिहार सरकार, छत्तीसगड सरकार आणि आयएमएला पक्षकार बनविले आहे. बिहार सरकारच्या वकिलांनी या प्रकरणात उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे अवधी मागितला.  एलोपॅथी औषधींवर माझा अजिबात विश्वास नाही. या औषधींच्या वापरामुळे कोरोना काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला, असे वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केले होते. या विधानानंतर आयएमएच्या बिहार व छत्तीसगड शाखेने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध फॉऊंजदारी गुन्हे दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता उन्हाळ्याच्या सुटीनंतर ठेवली आहे. (Baba Ramdev)

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT