Latest

Pune ganeshotsav 2023 : पुण्यातील प्रमुख मंडळे 6 नंतर येणार मिरवणुकीत; ‘दगडूशेठ’ची चारलाच मिरवणूक

अमृता चौगुले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख मानाच्या गणपती मंडळांसह हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आणि श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ही प्रमुख मंडळे गुरुवारी (दि. 28) अनंत चतुर्दशीला सायंकाळी सहानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष  अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. विसर्जन मिरवणूक वेळेवर संपविण्यावर आमचा भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी चार वाजता सहभागी होणार असल्याचे जाहीर केल्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती. मिरवणुकीतील शेवटच्या मानाच्या तीन मंडळांपैकी एक मंडळ दरवर्षीच्या तुलनेत लवकर मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने अन्य मंडळांची भूमिका काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्यापैकी चार मंडळांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे आणि श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टचे भूषण पंड्या या वेळी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमीच्याच वेळी मिरवणुकीत सायंकाळी सहानंतर सहभागी होऊ. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचे यांनी सांगितले.
थोरात म्हणाले की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे सायंकाळी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे, तर प्रमुख मंडळांचा निर्णय काय असेल? हा प्रश्न आम्हाला सातत्याने विचारला जात होता. भाविकांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकार्‍यांच्या भावनांचा विचार करून आम्ही यावर चर्चा केली. त्यात दुपारच्या वेळेत मिरवणुकीत सहभागी होणे आम्हा चारही मंडळांना शक्य नसल्याचे कळले.
मानाचे पाचही गणपती मंडळे लक्ष्मी रस्त्याने 3.30 च्या सुमारास जातात. त्यानंतर काही प्रमुख मंडळांचे गणपती जातात. त्या गणपती मंडळांना रोखून मधून जाणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे आम्ही नेहमीच्याच वेळेत निघणार आहोत. मिरवणुकीत पूर्णपणे शिस्त पाळण्याचे काम करण्यात येईल. आमची विद्युतरोषणाईची मंडळे आहेत. सायंकाळी सहा वाजताच आम्हाला निघणे शक्य आहे. त्यामुळे सायंकाळी निघण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक लवकर संपावी, आमचा हा प्रयत्न राहणार आहे.
बालन म्हणाले की, विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी सहभागी होत असलेल्या प्रमुख मंडळांनी केलेली सजावट आणि विद्युतरोषणाई हे सायंकाळनंतरचे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते. ते पाहण्यासाठी लाखो भाविक देशभरातूच नव्हे, तर जगभरातून येतात. त्यामुळे त्या सर्वांच्या भावनांचा विचार करता ठरलेल्या वेळेतच सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. तसेच, सर्व प्रकारची शिस्त पाळत विसर्जन मिरवणूक होईल.

फक्त चार चौकांत ढोलवादन

लक्ष्मी रस्त्यावर चौकाचौकाँत थांबून ढोल-ताशा पथके वादन करीत असल्यामुळे मिरवणुकीला उशीर होतो. तो टाळण्यासाठी प्रत्येक चौकात स्थिर वादन न करता फक्त चार चौकांत दहा मिनिटे पथकांमार्फत वादन करण्यात येणार आहे. हा निर्णय चारही मंडळांनी घेतला असल्याचे थोरात यांनी जाहीर केले. मिरवणुकीत पथकांची संख्या किती असावीष याचा निर्णय अजून झालेला नाही. पथकांची संख्या कमी असण्यावर आमचा भर असेल, असेही त्यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, आम्हाला त्यांच्यासोबत चार वाजता निघणे शक्य होणार नाही. पोलिसांनी आम्हाला रस्ता रिकामा करून द्यावा आणि जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा. बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्त्यापर्यंत पोलिसांनी आम्हाला मार्ग उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर सिटी पोस्ट चौक ते टिळक चौकात मंडळांची मिरवणूक जायला अडीच ते तीन तास लागतील. त्यामुळेच आम्ही लगेच पुढे जाऊ आणि मिरवणूक लवकर संपेल.
– अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ

या असतील मंडळांच्या वेळा

  • श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ 6.30 वाजता
  • हुतात्मा बाबू गेनू गणपती ट्रस्ट  6.45 वाजता
  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट : 7.00 वाजता
  • अखिल मंडई मंडळ :7.30 वाजता

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT