Latest

पुण्यातील मध्य भागातील वाहतुकीत मोठे बदल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता बुधवारपासून (20 सप्टेंबर) मध्य भागातील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सायंकाळी पाचनंतर मध्य भागातील रस्ते वाहतुकीस बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्वर चौक (मंडई) यादरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मध्य भागातील वाहतूक बदल विसर्जन मिरवणुकीपर्यंत लागू राहणार आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणार्‍या सर्व वाहनांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकातून (अलका चित्रपटगृह) टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगर भागातून स्टेशनकडे जाणार्‍या वाहनांनी वेधशाळा चौक, शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौकमार्गे पुणे स्टेशनकडे किंवा नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारे दुचाकीस्वार महापालिका भवन येथील टिळक पूल, नदीपात्रातील रस्त्यावरून अलका चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील. बाजीराव रस्ता तसेच केळकर रस्त्यावरून येणार्‍या वाहनांनी अप्पा बळवंत चौक, फुटका बुरूज चौक, गाडगीळ पुतळा, कुंभारवेसमार्गे इच्छितस्थळी जावे.

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते बेलबाग चौक, रामेश्वर चौक ते मंडई, शनिपार चौक, सेवासदन चौक ते अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक ते फुटका बुरूज चौक या भागांत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. 20 ते 27 सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी पाचनंतर गर्दी ओसरेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज रस्ता, महापालिका कार्यशाळा चौक, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर चौक ते भगवान महावीर चौक यादरम्यान असलेल्या एकेरी वाहतुकीचे आदेश शिथिल करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT