Latest

सीमा भागातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सीमावर्ती ८६५ गावांत ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ही योजना सीमा भागातील नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे.

असा आहे शासन निर्णय

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगांव, कारवार, कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील १२ तहसीलमधील ८६५ गावांतील अंत्योदय अन्न योजना, २) प्राधान्य गटातील कुटुंबे व ३) अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २. उपरोक्त कुटुंबांना सदर योजनेचा लाभ हमी तत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत भविष्यात लाभार्थ्यांचे काही निकष बदलल्यासव इतर काही बदल झाल्यास ते बदल महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील लाभार्थी कुटुंबांना लागू राहतील.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील लाभार्थी कुटुंबाना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता अनुज्ञेयता तपासण्यासाठी कर्नाटक राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांने निर्गमित केलेली शिधापत्रिका तपासली जाईल. व्यक्तीची ओळख आधार कार्डव्दारे व ते नसल्यास मूळ योजनेने मान्य केलेल्या १४ ओळखपत्राद्वारे ओळख पटविली जाईल. शिधापत्रिका व आधार कार्डद्वारे निवासाची खात्री केली जाईल. तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीने ठरवलेल्या मसुद्यानुसार कुटुंबाच्या सदस्याचे स्व-घोषणा पत्र (सोबत जोडल्याप्रमाणे) बंधनकारक राहील.

सदर नागरिकांना योजनेंतर्गत प्रति कुटुंब/प्रति वर्ष रु.१.५ लक्ष रकमेचे (मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतिवर्ष रु. २.५० लाख) विमा सरंक्षण रक्कम व ३४ तज्ज्ञसेवा मधील ९९६ उपचारांचा लाभ अनुज्ञेय राहील.

सदर सीमा भागातील ८६५ गावांतील कुटुंबांना महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय / खासगी अंगीकृत रुग्णालयांमधून (बेळगाव येथील के. एल. इ. हॉस्पिटल व पणजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सध्या अंगीकृत असलेल्या १००० रूग्णालयांव्यतिरिक्त अतिरिक्त १४० रुग्णालये कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये अंगीकृत करण्यास व १० मराठी भाषिक असणारी रुग्णालये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगांव, कारवार, कलबुर्गी, बिदर या मराठी भाषिक जिल्ह्यांमध्ये अंगीकृत करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT