Latest

Maharashtra Politics : ‘जनतेला’ पोपट बनवलं जात आहे, रोहित पवारांची ‘पोपट’ प्रकरणात उडी; जाणून घ्या ‘पोपट’ प्रकरण

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे." असं ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही 'पोपट' प्रकरणात उडी घेतली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गट, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांमध्ये 'पोपट' शब्द वारंवार येऊ लागला आहे. कोणाचा कसा 'पोपट' झाला यावर सातत्याने एकमेकांवर टिका होत आहे. यामध्ये आता रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. जाणून घ्या नेमके हे पोपट प्रकरण काय आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : कोणाचा पोपट मेला?

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात 'पोपट' हे प्रकरण खूप चर्चेत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत या प्रकरणात उडी मारली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "राजकीय वक्तव्ये करताना दोन्ही बाजूंनी पोपट मेल्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे. कुणावर टीका करायची नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता जनतेला पोपट बनवलं जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये दृढ होत आहे, हे मात्र नक्की!"

'पोपट मेला आहे' जाहीर करण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची : उद्धव ठाकरे

गेले काही दिवस चर्चेत असणारा आणि महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेला सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निर्णयावर बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की,"पोपट हलत नाही, निश्चल आहे. त्याने डोळे मिटलेले आहेत. चोच उघडत नाही. श्वासही घेत नाहीये. हे वर्णन करून पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवलं आहे.

'मविआ'चा पोपट मेला आहे : देवेंद्र फडणवीस

महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला आधीच तडे गेलेले आहेत. कोणी कसे बसायचे, कुठे उभे राहायचे, कोणी बोलायचे यावरून वाद सुरू आहेत. त्यांच्याबद्दल पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्यावर आम्ही बोलण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुरते कळले आहे की, आपला पोपट मेलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पोपट जिवंत आहे हे दाखवावे लागते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Maharashtra Politics : राऊत-राणे 'पोपट' प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊतही म्हणाले होते की, " पोपट मेलाच आहे, फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचे आहे, या प्रतिक्रियेला भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊत यांना सवाल करत म्हंटले की,"संजय राऊत यांना सध्या काही कामधंदा नाही. पोपट मेला वैगरे ही त्यांची भाषा आहे का?
आता रोहित पवार यांच्या ट्विटनंतर दोन्ही गटाकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे राजकिय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT