Latest

Maharashtra Politics : ‘त्‍यांना’ ध चा मा करायची सवयच : अजित पवारांचे प्रत्यूत्तर

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "यंदाच्या निवडणुकीत काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील. पण त्याला भुलू नका." असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले हाेते. या वक्तव्यावर शरद पवार गटातून जोरदार टीका होवू लागली. आता या टीकेला अजित पवारांनी  प्रत्यूत्तर दिले आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : नाटकीबाज लोकांना…..

अजित पवारांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की," काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत; पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे.

काय म्हणाले होते अजित पवार ?

बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.४)  हल्लाबोल केला. ते म्हणाले, "यंदाच्या निवडणुकीत काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील. पण त्याला भुलू नका. माझ्याच विचाराचा खासदार बारामतीतून निवडून द्या. बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असू द्या, मीच उमेदवार आहे, असे समजून त्याला निवडून द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून मी मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेल. आजवर मी राज्य सरकारकडून कामे करून घेत होतो. केंद्रातूनही बारामतीसह मतदारसंघातील अन्य तालुक्यांसाठी मी निधी आणत विकास करणार आहे. आतापर्यंत असे किती आमदार-खासदार येऊन गेले, आपल्या आजूबाजूला देखील किती आमदार आणि खासदार होऊन गेले. पण, आपल्या अडचणींना कोण आपल्याला उपयोगी पडतंय याचाही विचार आपण करा, असेही अजित पवार म्हणाले हाेते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT