Latest

Maharashtra Kesari Kusti 2023 : नोव्हेंबरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ चा थरार; तब्बल 900 कुस्तीगीरांचा सहभाग

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सोमेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाराष्ट्र केसरी' किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुख्य संयोजक प्रदिप कंद, संदिप भोंडवे आणि योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात करणार आहेत. 35 जिल्ह्यातील आणि 11 महापालिकामधील 46 तालीम संघातील 900 ते 925 मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. 900 पेक्षा अधिक कुस्तीगीर, 90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

अधिकृत महाराष्ट्र केसरी कोणती

खासदार रामदास तडस यांच्या संघटनेने लोणीकंद येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा केली आहे. ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्याचबरोबरी बाळासाहेब लांडगे यांच्या संघटनेनेही धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी होणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही अधिकृत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणती हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
चौकट

भारतीय कुस्ती महासंघाची अधिकृत मान्यता

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष असलेले खासदार रामदास तडस यांच्या संघटनेला अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने एप्रिल 2023 मध्येच याबाबतचे अधिकृत पत्र संघटनेला दिलेले असल्याने आमचीच स्पर्धा अधिकृत असणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संदिप भोंडवे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT