Latest

Mahaparinirvan Din 2023 : मुंबईत ‘आंबेडकर सर्किट’ का होऊ नये ?

मोहन कारंडे

– ज. वि. पवार, सहसंस्थापक, दलित पँथर

1 डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत आंबेडकरी अनुयायी मुंबईभर फिरत असतात. त्यांना बाबसाहेब कोठे कोठे राहत होते, कोठे शिकले, कोठे आपले कार्य केले, हे पाहण्याची उत्सुकता असते. बाबासाहेबांची कर्मभूमी मुंबईतील ऐतिहासिक जागांची यादी व्हावी. खेड्यातली माणसे श्रद्धेपोटी येतात; परंतु ती निर्धन असतात. अशावेळी त्यांना ही स्थळे दाखविण्याची जबाबदारी शासनाने, मुंबई महानगरपालिकेने का घेऊ नये? (Mahaparinirvan Din 2023)

संबंधित बातम्या : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कणाहीन माणसाला ताठर कणा देण्यासाठी आयुष्यभर जे प्रयत्न केले, त्यामुळे आंबेडकरी समाजातला माणूस हा स्वाभिमानी आणि उर्जस्वल झालेला दिसतो. तो अनेकांना वाकविण्यात वाक्बगार झाला, याचे कारण बाबासाहेबांचे अविश्रांत परिश्रम. आज आपण पाहतो की, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पावलांचे ठसे उमटले, त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांची स्मारके उभारली जात आहेत. बाबासाहेबांनी केलेली आंदोलने, सभा-संमेलने व परिषदा यांचा आज मागोवा मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. बाबासाहेबांची कर्मभूमी मुंबई शहर आहे. त्यांचे शिक्षण सातारा व मुंबई शहरात झाले. त्यांच्या मानवीमुक्ती लढ्याचे केंद्र मुंबई हेच होते. आयुष्याच्या रात्री त्यांचे वास्तव्य दिल्ली येथेच होते अन् त्यांचे महापरिनिर्वाण झाले तेही दिल्ली येथील घरातच. बाबासाहेबांची कर्मभूमी मुंबई असल्यामुळे त्यांचे पार्थिव मुंबईतच आणण्यात आले आणि त्यांचा अंत्यविधी दि. 7 डिसेंबर 1956 रोजी दादर येथील स्मशानभूमीत झाला. 1956 ते 1966 या काळात त्या परिसराला भीमचौपाटी असे संबोधले जात होते; परंतु 1966 साली त्यांचे सुपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वसामान्य माणसाच्या अर्थबळावर 14 एप्रिल 1966 रोजी चैत्यभूमी उभारली. या चैत्यभूमीसमोर नतमस्तक होण्यासाठी आंबेडकरी माणूस महापरिनिर्वाणदिनी लाखोंच्या संख्येने उपस्थित असतो. (Mahaparinirvan Din 2023)

सुरुवातीला 6 डिसेंबरला येणार्‍यांची पावले आता एक डिसेंबरपासूनच चैत्यभूमीकडे वळू लागली आहेत. ही माणसे देशाच्या कानाकोपर्‍यातून येतात. एक डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत आंबेडकरी अनुयायी मुंबईभर फिरत असतात. त्यांना बाबसाहेब कोठे कोठे राहत होते, कोठे शिकले, कोठे आपले कार्य केले हे पाहण्याची उत्सुकता असते. खेड्यातली माणसे श्रद्धेपोटी येतात; परंतु ती निर्धन असतात. अशावेळी त्यांना ही स्थळे दाखविण्याची जबाबदारी शासनाने मुंबई महानगरपालिका व बी.ई.एस.टी.सारख्या व्यवस्थापनांना सांगितले तर त्यांचा वेळ व पैसा वाचेल याद़ृष्टीने प्रयत्न केल्यास जे अनाठायी ठरणार नाही आणि म्हणूनच काही स्थळे सुचवावीशी वाटतात. या स्थळांची यादी करून मुंबईत पर्यटकांसाठी 'आंबेडकर सर्किट' सुरू केले, तर केवळ आंबेडकरी अनुयायांसाठीच नव्हे, तर जगभरातून येणार्‍या पर्यटकांनाही बाबासाहेबांच्या पावनस्पर्शाने इतिहाबद्ध झालेल्या या जागा बघता येतील. जाणून घेता येतील.
यातील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे, मुंबई दिवसेंदिवस बदलत आहे. जुन्या इमारती नष्ट करून नवनवीन इमारती बांधल्या जात आहेत, त्यामुळे काही स्थळे काळाच्या उदरात दडपली गेली. उदा., बाबासाहेब सातार्‍यावरून मुंबईला आले तेव्हा ते ज्या बदक चाळीत राहत होते, ती बदक चाळ आता नव्या दिमाखात उभी राहिली आहे आणि तरीही काही ठिकाणे सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही. ही स्थळे सांगताना, मी भौगोलिक वास्तव्याचा आधार घेतला आहे. त्यामुळे ती कालसापेक्ष नसून भूगोल सापेक्ष आहेत. (Mahaparinirvan Din 2023)

1. जयराज हाऊस

भौगोलिकद़ृष्ट्या सगळ्यात प्रथम स्थळ येते ते कुलाबा येथील जयराज हाऊस. या जयराज हाऊसच्या पहिल्या माळ्यावर बाबासाहेबांचे तात्पुरते निवास असायचे अन् तेही 1954-1955 च्या दरम्यान. ही इमारत आजच्या कुलाबा बसस्टेशनच्या परिसरात होती. ही इमारत मुंबई सरकारने ताब्यात घेतली होती. तत्कालीन राज्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही जागा दिली होती. या जागेत बाबासाहेबांचे अनेक सहकारी त्यांना भेटायला जयराज हाऊस येथे जायचे. 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर धम्मदीक्षा झाल्यावर महाराष्ट्र दलित साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे बाबासाहेबांनी कबूल केले होते, अशी आठवण मला परिषदेचे प्रमुख आप्पासाहेब रणपिसे यांनी सांगितली होती. या खोलीतून बाबासाहेबांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीतील सहभागाचा निर्णय याच खोलीतून घेण्यात आला.

2. एल्फिन्स्टन महाविद्यालय

भौगोलिकद़ृष्ट्या दुसरे ठिकाण हे एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे देता येईल. बाबासाहेब यांनी याच महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी ग्रहण केली. इथून आपण काही पावलांवर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या आर्टस् अँड सायन्स कॉलेजच्या परिसरात येतो. मरिन लाईन्स, चर्चगेट परिसराचा हा भाग येतो. तेथे मिलिटरी कॅम्प होता, आज तेथे सरकारी कार्यालये आहेत. या परिसरातील एका मोठ्या झाडाखाली बाबासाहेब बसायचे अन् मग त्यांना भेटायला वेगवेगळ्या स्तरांतील आणि थरांतील मंडळी येत असत. इथूनच हाकेच्या अंतरावर मेनकावा व अल्बर्ट या दोन इमारती होत्या. त्यांचा ताबा भारत सरकारकडे होता. त्या दोन्ही इमारती कॉलेजसाठी बाबासाहेबांनी घेतल्या व त्यांचे नाव पुढे बुद्धभवन व आनंदभवन असे केले. आजही या दोन्ही इमारती असून, त्यात जे कॉलेज आहे त्याचे नाव बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स व लॉ असे ठेवले आहे. आनंदभवनच्या तळमजल्याचा उपयोग पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयासाठी होत असतो. हा कालखंड आहे 1945-46 चा.

3. एल्फिन्स्टन हायस्कूल

ठाकूरद्वारपासून सीपी टँक भागाकडे वळलो की, तेथे एल्फिन्स्टन हायस्कूल होते. या शाळेत बाबासाहेबांचे माध्यमिक शिक्षण झाले होते. हेच ते हायस्कूल जेथे ना. म. जोशी नावाचे शिक्षक होते. फळ्याच्या मागे जेवणाचे डबे ठेवलेले असत. जोशी गुरुजींनी गणित सोडवायला भीमराव आंबेडकरांना पाचारण केल्यावर विद्यार्थ्यांनी जी हुल्लडबाजी केली, तिला आटोक्यात आणले ते याच गुरुजींनी. हे गुरुजी पुढे कामगार नेते म्हणून प्रसिद्धीस पावले. आश्चर्याची बाब म्हणजे, हे गुरुजी आणि विद्यार्थी राऊंड टेबल कॉन्फरन्सला हजर राहिले.

4 बी.आय.टी. चाळ

एल्फिन्स्टन हायस्कूलनंतर अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे परळचा भाग. तेथे बी.आय.टी. (बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) च्या दोन इमारती आजही आहेत. त्यातील नं. 1 च्या दुसर्‍या माळ्यावरील खोली नं. 50 व 51 येथे भीमरावांचे बालपण गेले. या इमारती बाबासाहेबांचे वडील सुभेदार मेजर रामजी बाबा सकपाळ यांनी अर्ज-विनंत्या करून तत्कालीन मुंबई गव्हर्नरकडून मिळविल्या. माता रमाईंचा संसारही याच जागेत फुलला. याच परिसरातील दामोदर हॉलमध्ये बाबासाहेबांचे कार्यालय होते. हे कार्यालय प्रामुख्याने शिवतरकर मास्तर पाहायचे. याच बी.आय.टी. चाळीत बाबासाहेबांचा लाडका मुलगा राजरत्न मृत्यू पावला व त्यानंतर बाबासाहेबांनी त्या खोलीत जाणे कमी केले व दत्तोबा पोवार यांना माझ्या आयुष्यातले मीठ संपुष्टात आले, असे लिहिले. ही इमारत आजही आहे आणि एका खोलीत भाडेकरू राहत आहेत. 'राऊंड टेबल'ला बाबासाहेब इथूनच गेले. केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र भेट दिले तो हाच परिसर.

5. हबीब मार्केट, भायखळा

राजगृह या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याआधी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे माता रमाई-बाबासाहेब यांचे विवाहस्थळ. नवरा-नवरी दोन्ही गरीब असल्यामुळे लग्नासाठी ना हॉल, ना लग्नपत्रिका. नवरीचा मामा हबीब मार्केट, भायखळा पश्चिम येथील कामगार. त्यानेच 4 एप्रिल 1906 रोजी फिश बाजारातील कोळणी उठून गेल्यावर लग्न ठरविले. माशांच्या दुर्गंधीत हे लग्न पार पडले. चरित्रकार धनंजय कीर यांनी हे लग्न भायखळ्याच्या बाजारात झाल्याचे म्हटले; परंतु ते 'त्या' बाजारातील नव्हे, तर हबीब मार्केटमध्ये लग्न उरकले. लग्नस्थळ आणि लग्न दिनांक मी शोधून काढली.

6. 'राजगृह'

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 'राजगृह.' दादर येथील हिंदू कॉलनीतील ही 129 नंबरची इमारत. बाबासाहेबांनी येथील दोन इमारती घेतल्या. त्यापैकी एक इमारत विकली अन् त्यातून 'राजगृह' हे ग्रंथघर म्हणून बांधले. ग्रंथांसाठी इमारत बांधणारे बाबासाहेब हे एकमेव जागतिक व्यक्तिमत्त्व. या इमारतीत त्यांची हजारो पुस्तके होती. पुस्तकांबरोबरच सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी तेथेचे वसतिगृह सुरू केले. विद्यार्थ्यांचे आणि पुस्तकांचे संगोपन याच 'राजगृह'ने केले. याच 'राजगृहा'त आईसाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. एवढेच नव्हे, तर बाबासाहेबांचा त्यांच्या भाषेत सोन्यासारखा मुलगा भय्यासाहेब आंबेडकर यांचे कलेवर याच राजगृहातून बाहेर पडले. बाबासाहेब हे 1932 च्या दरम्यान बुद्धांकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाले होते. 'राजगृह' हे बौद्ध संस्कृतीतले नाव. आज या राजगृहात आंबेडकर कुटुंबीय राहते. या राजगृहाने माझा 81 वा वाढदिवस साजरा केला. यापेक्षा आणखी कोणता सन्मान असू शकतो? याच राजगृहातून आणखी एक कलेवर अंत्यविधीसाठी बाहेर पडले आणि ते म्हणजे डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे. म्हणजे बाबासाहेबांच्या दोन्ही पत्नींचे कलेवर याच राजगृहाने पाहिले. या राजगृहाने अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय मीराताई यशवंतराव आंबेडकर, भय्यासाहेब, बाळासाहेब, भीमराव व आनंदराज यांनी घेतलेले आहेत. या राजगृहाचा काही भाग पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात असल्यामुळे सोसायटीचे अध्यक्ष या इमारतीत राहत असत. आज हे राजगृह श्रद्धास्थान झाले आहे. माता रमाईंच्या संसारोपयोगी वस्तू जशा येथे आहेत, तसेच येथे वाचनालयसुद्धा होते.

7. आंबेडकर भवन

राजगृहासारखे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन. दादर पूर्वेकडील गोकुळदास पास्ता लेनवरील हे भवन म्हणजे सर्व प्रकारच्या आंदोलनांचे ठिकाण. या इमारतीत भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्यालय आहे. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी व पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची कार्यालये आहेत. आंबेडकरी चळवळीतल्या अनेक कार्यक्रमांचे साक्षीदार हे भवन आहे. माझ्या तर सर्वच पुस्तकांचे प्रकाशन येथेच झाले. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या देखरेखीखाली याचे व्यवस्थापन होत असते.

SCROLL FOR NEXT