Latest

Mahadev App Scam : ऑनलाईन जुगाराच्या अ‍ॅपवर ईडीची कारवाई; बाॅलिवुड सेलिब्रिटी ईडीच्या रडावर

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महादेव बूक मनी या ऑनलाईन जुगाराच्या अ‍ॅपवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाॅंड्रिंग कायद्यान्वये धडक कारवाई करत तब्बल ४१७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मूळचे छत्तीसगड, भिलाईचे रहिवासी असलेले सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे महादेव ऑनलाईन बुकचे मुख्य प्रवर्तक असून ते त्यांचे कामकाज दुबईतून चालवत आहेत. यातील चंद्रकार याच्या युएईमध्ये झालेल्या विवाह सोहळ्यात अभिनेता टायगर श्रॉफ, कृष्णा अभिषेक, पार्श्वगायिका नेहा कक्कड, पार्श्वगायक आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी, कॉमेडियन भारती सिंग, अभिनेत्री सनी लियॉनी, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुसरत भरूचा आदी उपस्थित होते. या विवाह सोहळ्यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा रोखीने व्यवहार असून हे बाॅलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आले आहेत. (Mahadev App Scam)

महादेव बेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रिटी आणि सरकारी अधिकाऱ्यांना यातून पैसे गेल्याचा ईडीचा दावा आहे. याच प्रकरणात ईडीने नुकतील मुंबईसह कोलकता, भोपाळ अशा तब्बल ३९ ठिकाणी छापेमारी करुन महत्वपूर्ण कागदपत्रे दस्तऐवज आणि मोठ्याप्रमाणात पुरावे जप्त केले आहेत. ईडीने या कारवाईत तब्बल ४१७ कोटींची अवैध मालमत्ता जप्त केली आहे. या अ‍ॅपशी संबंधीत योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. तर, ईडीला गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रोख रक्कम आणि १३ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले आहेत. (Mahadev App Scam)

महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपच्या वेबसाईटला नवीन वापरकर्त्यांची नोंदणी, वापरकर्ता आयडी तयार करणे आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून पैशांचे लाँड्रिंग करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मची व्यवस्था करणारे एक सिंडिकेट कार्यरत आहे. ७० टक्के आणि ३० टक्के नफा गुणोत्तरावर सहयोगींना पॅनेल, शाखा किंवा फ्रॅन्चायझीच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जाते. सट्टेबाजीतून मिळणारी रक्कम ऑफ-शोअर खात्यांमध्ये पळवून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात हवाला रॅकेटचा वापर केला जातो. तसेच, नवीन वापरकर्ते आणि  फ्रॅन्चायझींना आकर्षित करण्यासाठी सट्टेबाजीच्या वेबसाइट्सच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात रोख खर्च केला जात असल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले आहे. (Mahadev App Scam)

ईडीने याप्रकरणात सट्टेबाजी सिंडिकेटच्या मुख्य संपर्ककर्त्यासह चार आरोपींना अटक केली होती. तर, चंद्राकर आणि उप्पल यांनी यूएईमध्ये  एक साम्राज्य निर्माण केले आहे. याचे दर्शन त्यांच्या राहणीमानातून दिसून येते फेब्रुवारी महिन्यात चंद्राकरचा युएईमध्ये विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी सुमारे २०० कोटी रुपये रोख खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेण्यात आली होती. या लग्नात परफॉर्म करण्यासाठी सेलिब्रिटींना बोलविण्यात आले होते. वेडिंग प्लॅनर, नर्तक, डेकोरेटर इत्यादींना मुंबईतून भाड्याने नेण्यात आले आणि महत्वाचे म्हणजे विवाह सोहळ्यासाठीची रोख रक्कम देण्यासाठी हवाला चॅनेलचा वापर केला गेल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले आहे. (Mahadev App Scam)

ईडीने गोळा केलेल्या डिजिटल पुराव्यांनुसार, अंगाडिया योगेश पोपट यांच्या आर-१ इव्हेंट्स प्रा. लि.च्या नावाने ११२ कोटी रुपये हवालाद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले गेले आणि ४२ कोटी रुपये रोख देऊन हॉटेल बुकींग करण्यात आले. योगेश पोपट, मिथिलेश आणि अन्य संबंधित आयोजकांच्या परिसरात ईडीने झडती घेतली. यात ११२ कोटी रुपयांच्या हवाला पैशाच्या पावतीशी संबंधित पुरावे समोर आल्यानंतर योगेश पोपट याचा शोध घेण्यात आला. त्याच्याशी संबंधीत झडतीत २.३७ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. अनेक ख्यातनाम व्यक्ती या सट्टेबाजी संस्थांना मान्यता देत आहेत आणि संशयास्पद व्यवहारांद्वारे भरीव फीच्या बदल्यात त्यांच्यासाठी काम करत आहेत. त्यांना ऑनलाइन सट्टेबाजीच्या उत्पन्नातून पैसे दिले असल्याचेही ईडी तपासात समोर आले आहे. (Mahadev App Scam)

ईडीने भोपाळ येथील धीरज आहुजा आणि विशाल आहुजा यांच्या रॅपिड ट्रॅव्हल्सची झडती घेतली. महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक, कुटुंबिय, व्यावसायिक सहयोगी आणि अन्य सेलिब्रिटींच्या संपूर्ण प्रवास तिकीटांसाठी सट्टेबाजी पॅनलमधून मिळणारी बेकायदेशीर रोख कमाई आहुजा बंधूंनी चतुराईने मुख्य तिकीट पुरवठादारांकडे जमा केली. यातूनच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तिकिटे बुक करण्यात आली. रॅपिड ट्रॅव्हल्सने सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक स्टार-स्टडेड इव्हेंटसह महादेव समूहाच्या बहुतेक कार्यक्रमांसाठी प्रवासाची व्यवस्था केली होती. (Mahadev App Scam)

महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या मनी लाँड्रिंग ऑपरेशनमध्ये सहभागी असलेला कोलकाता येथील विकास छापरिया हा हवालाशी संबंधित सर्व ऑपरेशन्स हाताळत होता. ईडीने त्याच्या आणि गोविंद केडिया सारख्या त्याच्या सहकाऱ्यांची झडती घेतली. यात केडिया याच्या मदतीने छापरिया हा त्याच्या संस्थांद्वारे परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट्स, एक्झिम जनरल ट्रेडिंग आणि टेकप्रो आयटी सोल्युशन्स या मार्गाने भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक मार्गाने (एफपीआय) छापरिया यांच्या फायद्याच्या मालकीच्या संस्थांच्या नावावर रोख उत्पन्न आणि अन्य सुरक्षा होल्डिंग्जचे २३६.३ कोटी रुपये ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत गोठवले आहेत. (Mahadev App Scam)

केडिया याच्या डीमॅट होल्डिंग्समधील १६० कोटी रुपयांची मालमत्ता देखील ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत गोठवली आहे. तसेच, केडिया याच्या घर झडतीत १८ लाख रुपयांचे भारतीय चलन, सोने आणि दागिने असा एकूण १३ कोटींचा एेवज जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे ईडीने आत्तापर्यंत एकूण ४१७ कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे ईडीने सांगितले. (Mahadev App Scam)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT