Latest

Lunar eclipse 2023 | ५ मे ला दिसणार छायाकल्प चंद्रग्रहण, जाणून घ्या त्याची वेळ

दिनेश चोरगे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ५ मे रोजी भारतातून छायाकल्प चंद्रग्रहण (Lunar eclipse 2023) दिसणार आहे. भारतातून दिसणारे हे या वर्षीचे पाहिले ग्रहण असेल. या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून (Penumbra) जात असल्याने चंद्र किंचित अंधुक होतो म्हणून त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. २० एप्रिल रोजी अतिशय सुरेख असे हायब्रीड सुर्यग्रहण झाले होते, परंतु ते भारतातून दिसले नाही. ५ मे रोजी होणारे हे छायाकल्प चंद्रग्रहण फारसे सुंदर दिसत नसले तरी खगोलीय दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.

छायाकल्प ग्रहण म्हणजे काय

खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो, त्यामुळे चंद्र काळा, लाल दिसतो, परंतु छायाकल्प चंद्रग्रहणात मात्र चंद्र काळा, लाल दिसत नाही, तो नियमित पौणिमेच्या चंद्रासारखाच परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास थोडा काळपट झालेला दिसतो.

ग्रहण कसे घडते

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येते तेव्हाच चंद्र – सूर्य ग्रहणे होतात. चंद्र ग्रहणावेळी सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी येते आणि म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावली असतात. गडद सावली आणि उपछाया. गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उपछायेतून गेल्यास छायाकल्प चांद्रग्रहण घडते.

ग्रहण कुठून दिसेल

हे छायाकल्प चंद्रग्रहण आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पेसिफिक, इंडियन आणि अटलांटिक महासागरातून दिसेल.

ग्रहण केव्हा दिसेल

छायाकल्प चंद्रग्रहण ५ मे ला भारतीय वेळेनुसार ८.४४ वाजता सुरवात होईल. ग्रहणमध्य १०.५२ तर ग्रहण समाप्ती १.१ वाजता होईल.

निरीक्षण कसे करावे

छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पूर्ण दिसतो परंतु त्याचे तेज ग्रहण काळात ४ ते ५ % ने कमी होते किंवा गडद छायेकडील चंद्रबिंबाचा थोडा भाग किंचित काळपट दिसतो. बारकाईने पाहिल्यास हा फरक जाणवतो, अन्यथा नियमित निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तींना चांद्रग्रहण लागले हे कळत नाही. आकाश ढगाळ नसेल तर साध्या डोळ्याने घरूनच ग्रहण बघावे. दुर्बीण किंवा द्विनेत्रीं असल्यास हे ग्रहण उत्तम प्रकारे पाहता येते, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे  अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. (Lunar eclipse 2023)

           हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT