Latest

Lok Sabha elections 2024 : ‘मावळ’मध्ये शिवसेना शिंदे गटासमोर आव्हान

मोहन कारंडे

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणार्‍या मावळ लोकसभा (Lok Sabha elections 2024) मतदार संघात शिवसेना शिंदे गटाला ठाकरे गट आणि मित्रपक्षांशीच टोकाचा संघर्ष करावा लागत असल्याने ही लढत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा आपल्याकडे राखण्याबरोबरच बारणे यांना निवडून आणण्याचे आव्हान शिवसेना शिंदे गटासमोर आहे.

बारामती आणि खेड लोकसभा मतदार संघाची (Lok Sabha elections 2024) फोड झाल्यानंतर 2009 मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात पहिल्यापासूनच शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे. पहिल्या निवडणुकीत गजानन बाबर तर त्यानंतर दोन्ही वेळा श्रीरंग बारणे यांनी विजय मिळविला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव करून बारणे यांनी लक्षवेधी निकाल लावला होता. मात्र, त्याच शिवसेना आणि बारणेंना यावेळी महायुतीमध्ये तिकिटासाठी संघर्ष करावा लागत आहे.

शिवसेनेची दुहेरी कोंडी!

सलग दोन निवडणुकांमधील (Lok Sabha elections 2024) विजय आणि तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने बारणे यांना सहज तिकीट मिळेल, असे वाटत असताना अनपेक्षितपणे भाजप व राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला. या मतदार संघात भाजपचे दोन आमदार आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपच्या ताब्यात आहेत. या ताकदीचा दाखला देत भाजपने या जागेवर दावा केला. उमेदवारी न मिळाल्यास बारणेंचा प्रचारच करणार नाही, अशी भूमिका घेऊन मावळातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेची (शिंदे गट) कोंडी केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात उडी मारून लोकसभेचे उमेदवार म्हणून प्रचारही सुरू केला. भाजप, राष्ट्रवादीच्या विरोधास सामोरे जाताना बारणेंसमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आव्हान उभे ठाकल्याने त्यांची दुहेरी कोंडी झाली आहे.

निवडणुकीत वाढली रंगत

संजोग वाघेरे यांना लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections 2024) अनुभव नाही. तुलनेने बारणे हे अनुभवी असल्याने त्यांना वातावरण अनुकूल मानले जात असताना तिकिटावरून महायुतीमध्येच सुप्त संघर्ष असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे रंगत वाढली आहे. वाघेरे यांना अनुभव नसला तरी या मतदार संघात नात्यागोत्याचे राजकारण कामी येते. हीच मेख पकडून वाघेरेंनी प्रचार सुरू केला आहे. याउलट बारणेंचा तिकिटासाठी संघर्ष सुरू आहे. निवडणुकीच्या सर्वात शेवटच्या टप्यात मावळ लोकसभेसाठी मतदार होणार असल्याने पुरेसा कालावधी असला तरी चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.

आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठणार

बारणे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिंदे गटाला आपल्या अस्तित्वासाठी कडवी लढत द्यावी लागणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्यास आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सभांमधून एकमेकांचा समाचार घेताना दिसतील.

महायुतीचा धर्म पाळणार का?

तिकिटावरून झालेली घमासान विसरून भाजप व राष्ट्रवादीचे नेते महायुतीचा धर्म कितपत पाळतात, यावरूनही निकाल अवलंबून आहे. गतवेळी पार्थ पवार यांचा पराभव करणार्‍या बारणेंचा राष्ट्रवादी प्रचार करणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच बारामतीत शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी अजित पवारांना थेट आव्हान देत त्यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केल्याने नाराज झालेल्या मावळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला घेरले आहे. बारामतीत प्रचार न केल्यास मावळात शिवसेनेचा प्रचार न करण्याची भूमिका या नेत्यांनी घेतली आहे. दुसरीकडे भाजपनेही उमेदवारीवर दावा केल्याने ती न मिळाल्यास भाजप नेते शिवसेनेचा मनापासून प्रचार करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT