Latest

Lok Sabha Election 2024 : नवरदेवाची मतदानाची घाई आणि राणा दाम्पत्याची बुलेट्स्वारी !

निलेश पोतदार

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी देखील उमेदवार लोकांवर छाप पाडण्याची संधी सोडायला तयार नाहीत. लग्नसराईचा मुहूर्त आज असून बस स्थानकांवर तुफान गर्दी पहायला मिळात आहे. नवरदेवाची अन वराड्यांची लगीनघाई दिसून येत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. लोकशाही बळकट करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आडगाव खाकी उच्च प्राथमिक मराठी शाळा आडगाव खाकी येथे नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा आपला हक्क बजावला. त्यांनी आपल्या वाहनाने जिल्हा परिषद शाळा आडगाव खाकी येथे मतदाराचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडले. त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी लग्नासाठी रवाना झाले.

दरम्‍यान अमरावतीत नवनीत राणा दाम्पत्य बुलेटवरून लक्ष वेधत मतदानासाठी रवाना झाले. यावेळी सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देते. सकाळीच हनुमान चालिसाचे पठण केले. आई-वडिलांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. अमरावतीच्या जनतेला माहीत आहे की, यावेळी मतदान देशासाठी आहे आणि अमरावतीची जनता 100% मतदान हे अमरावतीच्या सुनेला आणि छोट्याशा कार्यकर्त्याला मतदान करून आशीर्वाद देतील. मैदानात लढण्याचा अधिकार सर्वांना आहे असेही नवनीत राणा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार आहेत. 2225 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी दिग्रस येथे जाऊन सहकुटुंब मतदान केले. नांदेडला महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगाव तालुक्यातील मौजे कोहळी येथे मतदान केले.

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आपल्या दर्यापूर मतदार संघातील लेहगाव या गावी मतदानाचा हक्क बजावला. आई, पत्नी आणि मुलासह त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी मतदान करावं, असे आवाहन बळवंत वानखडे यांनी केले. अमरावती मतदारसंघातील मोझरीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर मतदारांची तुफान गर्दी होती. मुलगी आकांक्षा ठाकूर यांच्यासह यशोमती ठाकूर यांनी मतदान केले.

अकोला महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी त्यांच्या मूळगावी पळसो बडे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, भारतीय जनता पार्टी महायुतीचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे तथा महाविकास आघाडीचे अभय पाटील रिंगणात उतरलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे आमदार निलय नाईक यांनी पुसद येथे मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडला आंबेडकर नगर येथील वाघाळा शहर महानगरपालिका शाळा येथे आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही प्रबळ करण्याकरिता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.

यासोबतच वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी मतदान केले. देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक असल्याने सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अमरावतीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी मतदान केल्यानंतर या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होईल, असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT