Latest

पुरुष हॉकी : उपांत्य फेरीत भारताचा बेल्जियमकडून पराभव, आता कांस्य पदकासाठी खेळणार

backup backup

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये जाण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न भंगले. ऑलिम्पिकच्या १२ व्या दिवशी पुरुष हॉकी च्या उपांत्य फेरीत भारत आणि जागतिक विजेता बेल्जियम यांच्यात सामना झाला. हा सामना बेल्जियमने ५-२ असा जिंकला. आता भारतीय संघ कांस्य पदकासाठी खेळणार आहे.

बेल्जियनने सामना सुरू झाल्यानंतर आक्रमक खेळाच्या जोरावर १ मिनिट ४ सेकंद वेळेत भारतावर गोल केला. पेनल्टी कॉर्नरवर लोइक लुईपर्टने गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. हा भारतासाठी मोठा झटका होता.

बेल्जियमने पहिला गोल केल्यानंतर भारताने पहिल्याच क्वार्टरमध्येच जबरदस्त पुनरागमन केले. ७ व्या मिनिटांला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतने ड्रॅग फ्लिक घेतला आणि भारतासाठी गोल केला. त्यानंतर मनदीप सिंगने ८ व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियम संघाने पुन्हा जोरदार चढाया केल्या. त्यामुळे भारतावर दबाव आला. या क्वार्टरमध्ये बेल्जियमला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारतीय बचाव फळीने त्यांचे आक्रमण परतवून लावले. पण थोड्या वेळाने दुसरा क्वार्टर संपायला १२ मिनिटे शिल्लक असताना पुन्हा बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर्सपैकी एक अलेक्झांडर हेंड्रिक्सने गोल (१९ व्या मिनिटाला) करत २-२ अशी बरोबरीची साधली.

तिसरा क्वार्टर २-२ बरोबरीत सुटला. पण चौथा क्वार्टर भारतासाठी चांगला गेला नाही. क्वार्टर संपायला ११ मिनिटं शिल्लक असताना बेल्जियमने आणखी एक गोल करत भारतावर आघाडी घेतली.

त्यानंतर बेल्जियमने सामना संपण्यास ७ मिनिटं बाकी असताना पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून आघाडी ४-२ ने वाढवली. त्यानंतर बेल्जियमने आणखी एक गोल करत ५-२ ने सामना जिंकला.

जर टीम इंडियाने हा सामना जिंकला असता तर पदकाची खात्री होती. हॉकी टीम इंडियाने शेवटचे पदक १९८० च्या ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT