पुढारी ऑनलाईन : राजस्थानच्या देगाना (नागौर) मध्ये एक मूल्यवान लिथियमचा (Lithium Reserves Rajasthan) नवीन साठा सापडला आहे. या साठ्याची क्षमता जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेल्या साठ्यापेक्षा जास्त आहे, असे वृत्त IANS ने राजस्थानमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. राजस्थानमध्ये नव्याने सापडलेले लिथियम साठे जम्मू आणि काश्मीरममधील साठ्यापेक्षा प्रचंड मोठे आहेत, असा दावा जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) ने केला आहे.
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि खाण अधिकार्यांनी असा दावा केला आहे की, हा साठा भारताच्या एकूण लिथियमच्या मागणीपैकी ८० टक्के पूर्तता करणार आहे. या साठ्याच्या शोधामुळे लिथियमसाठी चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते.
लिथियमच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारत आतापर्यंत चीनवर अवलंबून आहे. मात्र, राजस्थानमध्ये नवीन साठा सापडल्याने चीनची लिथियमचा पुरवठादार म्हणून असलेली मक्तेदारी संपुष्टात येईल आणि आखाती देशांप्रमाणे राजस्थान आर्थिकदृष्ट्या संपन्ना होईल, असे आयएएनएसने वृत्तांत म्हटले आहे. (degana rajasthan)
लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. लिथियमसाठी भारत पूर्णपणे परदेशी पुरवठ्यावर अवलंबून आहे आणि लिथियम महाग असल्याने त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. आता GSI ला देगाना परिसरात लिथियमचे मोठे साठे सापडले आहेत.
याआधी जम्मू-काश्मीरमध्ये मूल्यवान लिथियमचा ५९ लाख टन साठा सापडला आहे. त्याचे मूल्य जवळपास ३.३ लाख कोटी रुपये आहे. एकूण आवश्यकतेपैकी ८० टक्के लिथियम आपण सध्या चीनकडून आयात करतो. भारतात नुकताच सापडलेला लिथियम साठा चीनकडील साठ्यापेक्षा ४ पटीने अधिक आहे. देशाच्या हरित अर्थव्यवस्थेसाठी लिथियम मोठा गेम चेंजर ठरू शकतो. परिणामी, भारत आखाती देशांप्रमाणे संपन्न होण्याचे दिवस द़ृष्टिपथात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात एक टन लिथियमची किंमत ५७.३६ लाख रुपये आहे, हे त्यामागचे कारण! (lithium reserves in india)
भारत सध्या चीनसह दहा देशांतून लिथियमची आयात करतो. २०१८ मध्ये भारताने ११ हजार ७०० कोटींहून अधिक मूल्याचे लिथियम आयात केले. २०१४ च्या तुलनेत सध्या भारताकडून होणार्या लिथियम आयातीचे प्रमाण ४०० टक्क्यांवर गेले आहे.
लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू आहे.
तो चाकूने कापता येतो. पाण्यावर चक्क तरंगतो.
उपयुक्तता : हा धातू रासायनिक ऊर्जा साठवून तिचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो.
लिथियम हा बॅटरीत वापरला जाणारा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे.
घड्याळे, रिस्ट वॉच, लॅपटॉप, मोबाईल फोन अशा सर्वातच हा धातू वापरला जातो.
पांढरे सोने म्हणून याची ओळख आहे.
हे ही वाचा :