Latest

Lipstick detect recession : लिपस्‍टिक आणि अंडरवेअर विक्रीवरुन आर्थिक मंदीचा अंदाज येतो? जाणून घ्‍या ‘थिअरी’ …

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक अर्थव्‍यवस्‍था सध्‍या महागाई आणि मंदीचा सामना करत आहे. कोरोना महामारीवर मात करत जागतिक अर्थव्‍यवस्‍था पुन्‍हा एकदा रुळावर आली होती. मात्र २४ फेब्रुवारी २०२२ राेजी  रशिया आणि युक्रेनमध्‍ये युद्ध सुरु झाल्‍याने जागतिक आर्थिक संकट उभे ठाकले. मागील काही महिन्‍यांमधील आर्थिक परिस्‍थितीचा आढावा घेत जागतिक बँकने आर्थिक वर्ष २२-२३ मधील एकुण सकल उत्‍पनाचा अंदाज ८.७ टक्‍क्‍यांहून ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला आहे. अर्थशास्‍त्रातील तज्‍ज्ञांनी आर्थिक मंदीची चाहूलओळखण्‍यासाठी  यापूवीर्वी  एक परिणामवर अभ्‍यास केला आहे. तो आहे लिपस्‍टिक आणि अंडवेअर विक्रीवरील इफेक्‍टचा.(Lipstick detect recession )जाणून घेवूया या दोन वस्‍तूंची विक्री आणि आर्थिक मंदीचा काय संबंध आहे ते…

लिपस्‍टिक 'इफेक्‍ट' काय आहे?

महिलांच्‍या सौदर्यप्रसाधनांमध्‍ये लिपस्‍टिकला मोठे स्‍थान आहे. आजवर अनेक वेळा आर्थिक मंदीवेळी लिपस्‍टिकची विक्री वाढल्‍याचे दिसले. 2001 मध्‍ये लिपस्‍टिक इफेक्‍ट सर्वप्रथम चर्चेत आला होता. त्‍यावेळी असे निदर्शनास आले होते की, आर्थिक परिस्‍थिती बिकट असतानाही लिपस्‍टिकची विक्री वाढली होती. तर १९२९ आणि १९९३ मधील आर्थिक महामंदीवेळीही असेच निरीक्षण नाेंदवले गेले. होते. याला अर्थतज्‍ज्ञांनी लिपस्‍टिक इंडेक्‍स असे नाव दिले गेले.

जेव्‍हा लिपस्‍टिपची विक्री वाढते तेव्‍हा अर्थव्‍यवस्‍था कमकुवत होत असते. या दोन गोष्‍टी परस्‍परविरोधी आहेत. मंदीच्‍या काळात महिला त्‍वचेची काळजी घेणार्‍या क्‍लीन्‍सरपेक्षा लिपस्‍टिकमध्‍ये गुंतवणूक करतात. यामुळे त्‍यांना वाईट काळातही 'फिल गूड' वाटते. प्रोफेसर ज्‍युलिएट शोर यांनी १९९८ मध्‍ये 'द ओव्‍हरस्‍पेंट अमेरिकन' या पुस्‍तकात हा सिद्धांत मांडला होता. महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनांची खरेदी ही दररोजच्‍या जगण्‍यातील संघर्षापासून काही काळ सुटकेसारखी असते, असेही त्‍यांनी म्‍हटलं होते. विशेष म्‍हणजे सर्वात मोठ्‍या सौंदर्य प्रसाधन कंपनीपैकी एक  एस्‍टी लॉडर कंपनीचे अध्‍यक्ष लिओनार्ड लॉडर यांनीही या सिद्धांताला सहमती दर्शवली आणि त्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे दिले होते. त्‍यांनी नमूद केले की, अमेरिकेवर ९ /11चा दहशतवादी हल्‍ला आणि २००८च्‍या मंदीनंतर लिपस्‍टिकच्‍या विक्रीत वाढ नोंदवली गेल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले हाेते.

Lipstick detect recession : 'या' थिअरीची आताच चर्चा का?

अर्थतज्‍ज्ञांच्‍या मतानुसार सध्‍या पुन्‍हा एकदा अर्थव्‍यवस्‍थेवर लिपस्‍टिक इफेक्‍ट दिसत आहे. कारण २०२२ मधील पहिल्‍या तिमाहित लिपस्‍टिकच्‍या विक्रीत तब्‍बल ४८ टक्‍के वाढ झाली आहे. अमेरिकासह जगातील अनेक देशांमध्‍ये महागाईचा दर वाढला असता या देशांमध्‍ये  लिपस्‍टिपची विक्री वाढली आहे.

अंडरवेअरची विक्रीही सांगते मंदी येणार की नाही?

अंडरवेअरची विक्री आणि अर्थव्‍यवस्‍थेची अवस्‍था यांचा संबंध असताे असे अर्थतज्‍ज्ञ मानतात. २००८मध्‍ये अमेरिकेत मंदी आली होतीअंडरवेअर इंडेक्‍स थिअरीबाबत अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे माजी प्रमुख ॲलन ग्रीनस्पॅन म्‍हणाले हाेते की, " अंडरवेअरच्‍या विक्रीवरुन अर्थव्‍यवस्‍था कोणत्‍या अवस्‍थेत आहे याचा अंदाज बांधता येतो. आर्थिक मंदीच्‍या काळात पुरुष नवीन अंडरवेअर खरेदी करणे बंद करतात. अंडरवेअर हे अंतर्वस्त्र आहे. ते नेहमी झाकूनच राहते. त्‍यामुळेच पुरुष यावरील खर्च कमी करतात". असे ग्रीनस्‍पॅन यांनी आपल्‍या थिअरीमध्‍ये म्‍हटले होते.

ग्रीनस्पॅन यांच्‍या सिद्धांतानुसार अमेरिकेत २००७ ते २००९ या आर्थिक मंदीच्‍या काळात पुरुषांच्‍या अंडरविअरची विक्रीत मोठी घट झाली होती. अर्थव्‍यवस्‍था पुन्‍हा सावरल्‍यानंतर २०१०मध्‍ये पुन्‍हा यामध्‍ये वाढ झाली होती. आता जगातील काही देशांमध्‍ये लिपस्‍टिकची विक्री वाढली आहे तर अंडरवेअर विक्री कमी झाल्‍याचे दिसत आहे. यावरुन अमेरिकेसह काही देशांमध्‍ये आर्थिक मंदी चाहूल असल्‍याचे मानले जात आहे. बांधकाम क्षेत्र, बॅकांची अवस्‍था आणि वाहनांची विक्री यावरुनही एखाद्‍या देशाची अर्थव्‍यवस्‍था किती सदृढ आहे हे समजते. त्‍याचप्रमाणे लिपस्‍टिक आणि अंडवेअरच्‍या विक्रीवरुनही अर्थव्‍यवस्‍थेची अवस्‍था लक्षात येते हे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाल्‍याचा दावा अर्थतज्‍ज्ञ करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT