Latest

IPL 2023 : पंजाब किंग्जला झटका, लिव्हिंगस्टोन बाहेर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 : आयपीएल सुरू होण्यापूर्वीच पंजाब किंग्ज संघाला मोठा झटका बसला आहे. पॉवर हिटर लियाम लिव्हिंगस्टोन पंजाबसाठी पहिला सामना खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. 1 एप्रिल रोजी घरच्या मैदानावर केकेआर विरुद्ध आयपीएल मोहिमेला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डिसेंबरमध्ये गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर ईसीबीकडून फिटनेस क्लिअरन्स न मिळाल्याने लिव्हिंगस्टोन आयपीएलमधील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे संघ आणि कर्णधार शिखर धवन चिंतेत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

लिव्हिंगस्टोन हा पंजाब किंग्जचा प्रमुख सदस्य आहे. डिसेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये कसोटी पदार्पण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून लिव्हिंगस्टोन एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र, याबाबत पंजाब किंग्जकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पीटीआयच्या वृत्तानुसार, लिव्हिंगस्टोन जरी पहिल्या सामन्यातून बाहेर गेला असला तरी तो दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होऊ शकतो. लिव्हिंगस्टोनने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. त्याच्यासाठी गेल्या वर्षीचा आयपीएल हंगाम सर्वोत्तम ठरला. त्याने 14 सामन्यांत 36 च्या सरासरीने 437 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 182.08 राहिला.

SCROLL FOR NEXT