Latest

पोषक वातावरण नसल्याने राज्यात पावसाचा जोर कमी; कोकणच्या काही भागांत मुसळधार

अमृता चौगुले

पुणे : पोषक वातावरणाचा अभाव असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी असून, केवळ कोकणच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 12 जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. जुलै महिना सुरू होऊन आठवडा लोटला, तरीही मोठा पाऊस पडलेला नाही. सध्या दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मात्र, त्याचा जोर नाही. त्यामुळे पावसाचा जोर वाढत नाही.

घाटमाथ्यावरही पाऊस कमीच आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोकणात सोसाट्याच्या वार्‍यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी असून, मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस 12 जुलैपर्यंत हजेरी लावणार आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT