Latest

ST Bus History : …अशी धावली रस्त्यांवर पहिल्यांदा आपली लालपरी!!!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : एसटी आणि एसटी (ST Bus History) कर्मचाऱ्यांचा संप हा महाराष्ट्रातील धगधगता प्रश्न झालेला आहे. कर्मचारी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत तर, राज्य सरकार वारंवार कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही-आम्ही ज्या एसटीतून अर्थात लालपरीतून प्रवास करतो, त्या लालपरीचा सुरुवातीचा प्रवास कसा होता आणि कशी सुरूवात झाली, याचा इतिहास आपण जाणून घेऊ…

१) महाराष्ट्रात १९३२ साली पहिल्यांदा खासगी व्यावसायिकांद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची (ST Bus History) सुरूवात झाली. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि मुंबई प्रातांत १९४८ साली सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी बाॅम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशन (BSRTC) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली.

२) इंटरेस्टिंग बाब म्हणजे पहिली एसटी ही लाकडाची होती आणि त्याचं छप्पर चक्क कापडी होते. त्या एसटीत एकूण ३० प्रवाशांची क्षमता होती. नंतर-नंतरच्या फियाट, लेलॅंड, अल्बिओन, माॅरिस कमर्शिअल, स्टडेबेकर, फोर्ड, सेडान, शेवरले, या कंपन्यांच्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या.

३) BSRTC ची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर धावली. या बसचे चालक (ड्रायव्हर) तुकाराम पांडुरंग पठारे आणि वाहक (कंडक्टर) लक्ष्मण कवटे होते. त्यावेळी गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र असे तिन्ही मिळून 'बाॅम्बे स्टेट' होती. कारण, महाराष्ट्राची स्थापनाच झालेली नव्हती. त्यामुळे आताच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नाव BSRTC असे होते.

४) नंतरच्या काळात भाषावार प्रांतरचना झाली. त्यानंतर मुंबई, मध्य प्रांत आणि निजाम राज्याचा भाग असे एकत्र मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या तीन भागात वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर या BSRTC चं नाव 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ' अर्थात MSRTC हे नाव मिळालं.

५) सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत साधारण ३१ विभागांतून एसटीचे विभागीय कामकाज पाहिले जाते. इतकंच नाही तर एसटी महामंडळाकडून गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि गोवा, या राज्यामंध्येही प्रवाशांना सेवा देऊ लागली.

६) हा झाला आपल्या लालपरीचा प्रवास… पण, तिने आता कात टाकली आहे. शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही आणि शितल नावाने आरामदायी बसेसदेखील एसटी महामंडळाने सुरू केलेल्या आहेत. मेट्रोसिटीमध्ये प्रामुख्याने या बसेस चालविल्या जातात. बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आता मोबाईल ॲपही सुरू झालेले आहे. तिथं आरक्षणाचीदेखील सोय करण्यात आली आहे. इतकंच नाही तर मोफत वाय-फायची देखील सोय करण्यात आली आहे. मग मंडळी आपलं एसटी महामंडळ आणि लालपरी 'लई झ्याक' आहे की नाही?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT