Latest

पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'मनपाचे विद्यार्थी १५ दिवसानंतरही गणवेशाविनाच' अशा आशयाचे वृत्त दै. पुढारीमध्ये बुधवारी (दि.२८) प्रसिद्ध होताच महापालिकेची यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून आले. गणवेशासाठी लागणाऱ्या निधीच्या फाइलचा प्रवास तत्काळ व्हावा यासाठी नवे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी स्वत: लेखा विभागाकडे फाइल घेवून जात त्यास मंजुरी मिळवून प्रभारी आयुक्तांकडे नेली. तसेच शुक्रवारपर्यंत (३०) गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीला वर्ग केला जाईल याबाबतची व्यवस्था केली. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मनपाच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता बळावली आहे.

मनपाच्या विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच शालेय प्रवेशाची परंपरा यंदाही महापालिकेच्या शिक्षण विभागाने कायम राखली. पंधरवाडा उलटून देखील विद्यार्थ्यांना गणवेशाबाबत कोणत्याच हालचाली दिसून येत नसल्याबाबत वृत्त दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध केले गेले. तसेच गणवेशाच्या निधीची फाइल लालफितीत अडकण्याची शक्यताही व्यक्त केली. दरम्यान, यासंपूर्ण पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तत्काळ गणवेश मिळावा म्हणून मंगळवारी पदभार स्विकारलेल्या शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दुसऱ्याच दिवशी फाइलचा प्रवास सोपा केला. वास्तविक पाटील यांच्या स्वागतासाठी दिवसभर शहरातील मनपा शाळांमधील शिक्षकांनी गर्दी केली होती. परंतु त्यांनी हारतुरे स्विकारण्यास फारसे प्राधान्य न देता फाइलला गती देण्याचा प्रयत्न केला. लेखा विभागातील दोन ते तीन टेबलवरून फाइलचा प्रवास झपाट्याने पुढे नेत थेट प्रभारी आयुक्तांच्या टेबलवर थांबविला. तसेच यासंपूर्ण विषयाची गंभीरता देखील निर्दशनास आणून दिली. आयुक्तांनी देखील विषयाचे महत्व लक्षात घेता त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. शिक्षण विभागाचा अंतिम निर्णय हे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या सहमतीने होतात. शुक्रवारी त्यांच्यापुढे ही फाईल सादर करुन मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळपर्यंत २७ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधी शाळा व्यवस्थापन समितीला वर्ग केला जाईल.

गणवेशाची फाईलला लेखाविभागाने मंजुरी दिली असून, त्याबाबत प्रभारी आयुक्त‍ांशी चर्चा केली. त्यांनी देखील हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या असून, शुक्रवारपर्यंत गणवेश निधी वर्ग केला जाईल.

– बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी मनपा.

शाळा व्यवस्थापन समितीलाही आदेश

निधी वर्ग केल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना तत्काळ गणवेश द्यावेत, याबाबतचे आदेश दिले जाणार असल्याचेही शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी स्पष्ट केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या गणवेशाबाबतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT