Latest

लासलगाव : दुसऱ्या दिवशीही कांदा दरात घसरण; शेतकऱ्यांत अस्‍वस्‍थता

निलेश पोतदार

केंद्राच्या परवानगी नंतर व्यापाऱ्यांनी इराण, तुर्की, अफगाणिस्थानसह इतर देशातील कांदा आयात करताच आशिया खंडातील प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एका दिवसात कांद्याच्या कमाल दरामध्ये पाचशे रुपयांची घसरण तर सरासरी दरांमध्ये साडेतीनशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्याने शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात जवळपास कांदा दर सहाशे रुपयांनी कोसळले आहेत.

कांद्याचे वाढते दर येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरू नये याकरता केंद्र सरकारने आयकर धाडी, बफर स्टॉकची एक लाख मेट्रिक टनाहून अधिक शहरी बाजारपेठेत विक्री, अन कांदा आयात करत भाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येताना दिसत आहे.

दुसरीकडे शेतमालातून दोन पैसे मिळतील या उद्देशाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा हा चाळीत साठवून ठेवलेला होता.  बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या वजनात आणि प्रतवारी मध्ये घट झाली. त्‍यामुळे मिळणार्‍या भावातून कुठेतरी झालेला खर्च निघून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळणार होते, मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारला कांद्याचे भाव पाडण्यात यश आले असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

महागडी बियाणे, औषधे वापरून कांदा पिकविला. मात्र पुन्हा दोन दिवसात जवळपास ६०० रुपयांनी कांद्याचे भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. लासलगाव येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान १००० कमाल २७१२ रुपये तर सरासरी २३०० रुपये भाव मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT