Latest

भाषा ही तुमची ओळख असली पाहिजे : राज ठाकरे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगात भाषेमुळे तुम्ही ओळखले जातात. त्यामुळे भाषा हीच तुमची ओळख आहे. मी मराठी आहे. यापेक्षा मी मराठी बोलणारा माणूस आहे. हे समजले पाहिजे. तुम्ही मराठी भाषा बोलणारा माणूस असल्याचे भाषेमुळे तुम्ही ओळखले जातात. त्यामुळे भाषा ही तुमची ओळख असली पाहिजे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबईत आयोजित केलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जाहीर सभेत भाषण करुन आल्यावर काय बोललो, यापेक्षा काय दिले, हे महत्त्वाचे असते, अशी शिकवण दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. व्यंगचित्रामुळे माझे चौफेर वाचन वाढले. परंतु मी प्रेमाची पुस्तक वाचत नाही. तर मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशा महान व्यक्तींची आत्मचरित्रे वाचायला मला आवडतात. त्याचबरोबर ऐतिहासिक लेखनही मी आवडीने वाचतो, असेही ठाकरे यांनी सांगितले.

वाचन नसेल तर विचारांमध्ये तोकडेपणा येतो. त्यामुळे आपण वाचन केले पाहिजे. वाचनातून आपल्या पूर्वजांना समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत. शिवरायांचे चरित्र वाचायला आवडते, असेही राज ठाकरे म्हणाले. आपण मार्मिक आणि सामना वाचत नाही, माझ्याकडे हे दोन्ही येतात, पण मी वाचत नाही. हल्ली वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या फार नसतात. चॅनल्स तर बघवतच नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

पुतळे उभे करून उपयोग नाही, तर गडकिल्ल्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. जयंती, पुण्यतिथीला केवळ पुतळ्यांची स्वच्छता करून उपयोग नाही. इंदू मिल येथे स्मारक उभारले जात आहे. तिथे जागतिक दर्जाचे ग्रंथालयही झाले पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे मला इतिहास कसा वाचायचा? काय वाचायचा? हे समजले, असे ठाकरे यांनी सांगितले.

आत्ताची सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता मतदारांना काही किंमत आहे, असे मला काही वाटतच नाही. तुम्ही फक्त यांचे नोकर आहात. मतदान करा आणि मोकळे व्हा. बाकी आम्ही आमचे काय नाचायचे ते नाचू. आज याच्याबरोबर फुगडी तर उद्या त्याच्याबरोबर झिम्मा, असे चाललंय. सध्याच्या राजकीय स्थितीवर गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलेन, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT