Latest

बारामती : ‘सोमेश्वर’चे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडेंवर फसवणूकीचा गुन्हा

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बहिणीच्या नावे असलेल्या साडे आठ एकर जमिनीचे बनावट असाईन्मेंट डीड करत जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी, तसेच भाचींचे नावे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात असलेल्या शेअर्सची परस्पर विक्री करत त्याची रक्कम स्वतःसाठी वापरल्या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव मुगुटराव काकडे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 'यामध्ये माझा काहीच दोष नाही. हे सर्व गलिच्छ राजकारण आहे', असे शहाजीराव काकडे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी त्यांचे भाचे अभिजित बापूसाहेब देशमुख (रा. कळंबवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

संगीता बापूसाहेब देशमुख (ऐश्वर्या उर्फ संगीता महेंद्रसिंह जाधवराव), मनिषा बापूसाहेब देशमुख (मनिषा राजेंद्र शिंदे) व अनिता बापूसाहेब देशमुख (अनिता प्रमोद बर्गे) या फिर्यादीच्या बहिणी आहेत. या तिघींच्या नावे सोमेश्वर कारखान्याचे शेअर्स होते. त्यापैकी मनिषा व अनिता यांच्या नावे असलेल्या शेअर्सपैकी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे एका शेअर्सची रक्कम त्यांचे बॅंकेत खाते असताना ते नसल्याचे भासवून, प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधाचा वापर करून काकडे यांनी रोख स्वरुपात पैसे घेतले. दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी तीनही बहिणींच्या नावे असलेल्या इतर शेअर्समधून असाच अपहार करण्यात आला, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीचे आजोबा कै. मुगुटराव साहेबराव काकडे यांनी साडे आठ एकर जमिनी खरेदी करत ती १९६५ साली फिर्यादीच्या आईच्या नावे स्वखुशीने केली होती. त्या जमिनीचा जुना गट क्रमांक १७१ तर नवीन गट क्रमांक १६७ आहे. त्या जमिनीबाबत बारामती दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट असाईन्मेंट डीड करून दस्त क्रमांक ९३० अन्वये फिर्यादीच्या आईच्या परस्पर ही जमिन परस्पर इतरांना विकून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक करण्यात आली, असेही यात म्हटले आह.

…हे तर गलिच्छ राजकारण

माझ्या विरोधात दाखल फिर्यादीची मला माहिती मिळाली. फिर्यादीने नमूद केलेले जमिनीचे खरेदीखत १९९४ साली झालेले आहे. खरेदीखतावेळी मी कुठेही साक्षीदार म्हणून सह्या केलेल्या नाहीत. जे दोन साक्षीदार त्यावेळी उपस्थित होते. त्यातील एक हयात आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबात सुमन बापूसाहेब देशमुख यांनीच खरेदीखतावर सह्या केल्याचे सांगितले आहे. मी पुण्यातील खासगी हस्ताक्षर तज्ञांचा अभिप्राय यावर घेतला. त्यासाठी माझी बहिण सुमन देशमुख यांचे जिल्हा बॅंकेत असलेल्या खात्यावरील सही व खरेदीखतावरील सही एकच असल्याचा दिसून आले आहे. शेअर्सचा मुद्दाही चुकीचा आहे. माझ्याच क्षेत्रातील पिक पाणी नोंद मी तीन भाचींच्या नावे केली होती. त्याद्वारे त्यांना कारखान्याला सभासद करून घेतले होते. पुढे माझी मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांच्या नावे पिक पाणी नोंद होऊ लागली. भांचींची नोंद बंद झाली. २००२ नंतर सलग तीन वर्षे ऊस न आल्यास सभासदत्व रद्द होऊ लागले. पुढे ते रद्द झाले. शेअर्सची रक्कम मी स्वतः घेतली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु त्याच्याशीही माझा काडीमात्र संबंध नाही.

                      – शहाजीराव काकडे, माजी अध्यक्ष, सोमेश्वर सह.  साखर कारखाना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT