पाटणा; पुढारी ऑनलाईन
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची तब्येत मंगळवारी अचानक बिघडली. चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या लालू यांना उपचारासाठी दिल्लीला नेण्याची तयारी केली जात आहे. सध्या लालू यांच्यावर रांची येथील रिम्स मेडिकल बोर्डाचे पथक उपचार करत आहे. मेडिकल बोर्डच्या सल्ल्यानुसार लालू यांना दिल्लीला नेले जाणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या किडनीत पाणी झाले आहे. यामुळे त्यांची किडनी केवळ १३ टक्के काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीबाबत रिम्स मेडिकल बोर्डाने महत्वाची माहिती दिली आहे. लालू प्रसाद यांना किडनीचा त्रास जाणवत आहे. त्यासाठी त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती झारखंडमधील RIMS चे डायरेक्टर कामेश्वर प्रसाद यांनी दिली आहे.
चारा घोटाळ्याच्या पाचव्या खटल्यात (Fifth fodder scam case) लालू प्रसाद यादव यांना रांची येथील सीबीआय न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्यासह ३८ आरोपींना शिक्षा सुनावली आहे. दोरंदा कोषागारमधून १३९.५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. १५ नोव्हेंबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दोषी ठरवले होते.
चारा घोटाळा प्रकरणी २००१ मध्ये १७० आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाले होते. खटल्याची सुनावणी सुरु असताना ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर सात जण माफीचे साक्षीदार झाले होते. तब्बल १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये आरोप निश्चित केले होते. चारा घोटाळा प्रकरणातील अन्य चार खटल्यांमध्ये लालू प्रसाद यादव यांना १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लालू प्रसाद यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर ११ मार्च रोजी सुनावणी झाली होती. आता १ एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होणार आहे. सीबीआय न्यायालयाकडून शिक्षा सुनावल्यानंतर लालू यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.