Latest

Lakshmi Hebbalkar: बेळगावला दुसरे मंत्रिपद: लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अविनाश सुतार

बंगळूर: पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज (दि.२७) मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

गेल्या दोन दिवासांपासून राज्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. बेळगावमधून कोणाला मंत्री मिळणार याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर  (Lakshmi Hebbalkar) यांच्या गळ्यात मंत्रिपदाती माळ पडली. बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकासात हेब्बाळकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याचे फलित म्हणजेच त्यांना मंत्रिपद मिळाले आहे.

लक्ष्मी हेब्बाळकर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. त्यांनी बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्या कर्नाटक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. कर्नाटक प्रदेश प्रवक्तापदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. लवकरच खातेवाटप होणार असून हेब्बाळकर यांना महिला व बाल विकास खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगडगी, डॉ. शरण प्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी. सुधाकर, संतोष लाड, एनएस बोसेराजू, सुरेश बी. एस., मधू बंगारप्पा, डॉ. एम. सी. सुधाकर आणि बी. नागेंद्र यांचा समावेश आहे. (Karnataka cabinet expansion) त्यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT