Latest

रावरंभा चित्रपट : कुशल बद्रिके साकारणार क्रूरकर्मा कुरबतखान

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा 'कुरबतखान' या दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. येत्या १२ मे ला इतिहासातील हे 'मोरपंखी पान' पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे 'रावरंभा' ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला 'कुरबतखान' हा विजापूरचा क्रूर हेर होता. 'बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे', असं कुशल सांगतो.

शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित 'रावरंभा' चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे, कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत.

गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत.

SCROLL FOR NEXT