Latest

IPL 2024 : कोलकाताचा बंगळूरूवर सात गडी राखून विजय

दिनेश चोरगे

बंगळुरू; वृत्तसंस्था : कोलकाता नाईट रायडर्सने 'आयपीएल'च्या सतराव्या हंगामातील दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 विकेटस् राखून पराभव केला. आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा सहज पाठलाग करत केकेआरने 19 चेंडू राखून विजय मिळवला.

विराट कोहलीच्या 83 धावांच्या जोरावर आरसीबीने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. पाहुण्या संघाकडून फिल साल्ट (30), सुनील नरेन (47), व्यंकटेश अय्यर (50) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद (39) धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीने मोठी खेळी केली; पण किंग कोहलीच्या संथ खेळीचा टिकाव लागला नाही. केकेआरच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून विराट खेळी करून विजयाच्या दिशेने कूच केली. केकेआरकडून सुनील नरेनने 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 22 चेंडूत 47 धावा कुटल्या, तर व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूंत 50 धावा केल्या. सलग 9 वर्ष आरसीबीला आपल्या घरच्या मैदानावर केकेआरकडून पराभूत व्हावे लागले. बंगळुरूकडून यश दयाल, मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किंग कोहलीने अप्रतिम कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना यजमान आरसीबीला कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या रूपात मोठा झटका बसला. आरसीबीची मधली फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना विराट कोहलीने 59 चेंडूंत नाबाद 83 धावांची खेळी केली. कॅमेरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलने विराटला चांगली साथ दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये दिनेश कार्तिकने फिनिशिंग टच देत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. कोहलीने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 59 चेंडूंत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा केल्या. तर, फाफ डुप्लेसिस (8), कॅमेरून ग्रीन (33), ग्लेन मॅक्सवेल (28), रजत पाटीदार (3), अनुज रावत (3) धावा केल्या. दिनेश कार्तिकने 8 चेंडूंत 20 धावा ठोकत विराटला शेवटच्या दोन षटकांत उत्तम साथ दिली.

केकेआरकडून आंद्रे रसेल वगळता सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर सुनील नरेनला 1 बळी घेण्यात यश आले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कचीदेखील बेकार धुलाई झाली. स्टार्कलादेखील एकही बळी घेता आला नाही आणि त्याने 4 षटकांत 47 धावा दिल्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT