Latest

Kolhapur Politics | माजी आमदार के. पी. पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा, चर्चेला पूर्णविराम

स्वालिया न. शिकलगार

गारगोटी :

राष्ट्रवादीच्या फुटीमुळे माजी आमदार के. पी. पाटील कोणत्या गटात जाणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. गेले कित्येक दिवस के. पी. पाटील यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठिंबा दर्शविल्याचे समजते. (Kolhapur Politics)

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच माजी आमदार के. पी. पाटील यांनी काँग्रेसची फारकत घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली आहे. आमदारकीच्या कालावधीत ते दोन वेळा राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहिले आहेत. गेली कित्येक वर्षे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. तसेच गेली पंचवीस वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांची 'हसन-किसन'ची जोडी म्हणून कार्यरत आहे. मात्र राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते शरद पवार व त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी कोंडी झाली आहे. यामुळे के. पी. पाटील यांचीही कोंडी झाली होती.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही अजित पवारांच्या गटाला पाठिंबा दर्शविला. बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील यांनी मुदाळ येथील हुतात्मा स्वामी सुतगिरणीवर थेट कार्यकर्त्यांना बोलावून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर तर तरुण कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पाठीशी राहावे, अशी मते व्यक्त केली. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे तयार झालेल्या नव्या आघाडीत त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार प्रकाश आबीटकर हे यापुर्वीच नव्या आघाडीत आहेत. शिवाय बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आल्याने के. पी. पाटील यांच्यासमोर कोणता झेंडा घेऊ हाती असा पेच निर्माण झाला होता.

हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या कोल्हापूर येथील स्वागत सोहळ्याकडे तसेच नागरी सत्काराकडे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यानी पाठ फिरवली होती. तरी देखील के. पी. पाटील यांनी कागल येथील शासकीय विश्रामधामवर हसन मुश्रीफ यांची चोरी चोरी छुपके छुपके भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मेहुणे ए. वाय. पाटील यांनी के पींच्या अगोदर नव्या आघाडीत केलेला प्रवेश आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी मुश्रीफ यांची भूमिका यामुळे माजी आमदार के. पी. पाटील हे अजित पवार यांच्या गटात जातील, अशी शक्यता वाटत होती. त्यातच गेल्याच आठवड्यात बिद्री कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाच्या इरादा पत्राच्या पूर्ततेसाठी मुश्रीफ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर रोजी कोल्हापुरात अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या उत्तरदायित्व सभेच्या वेळी माजी आमदार के. पी. पाटील आपला भूमिका जाहीर करतील, अशी शक्यता होती.

दरम्यान कोल्हापूर येथे १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तर दायित्व महासभेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील अजित पवार यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपली उपस्थिती लावून उपमुख्यमंत्री अजित पवार व हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

SCROLL FOR NEXT