गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा, येथील अर्जुन उद्योग समुहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पत्नी तेजस्विनी (वय ३६) व मुलगा अर्जुन (वय १४) यांच्यासह जीवनयात्रा संपविली. आज (दि.२४) पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मांडत गडहिंग्लज (Gadhinglaj) बंदची हाक दिली. (Kolhapur News)
उद्योजक शिंदे हे समाजाशी समरस असे व्यक्तिमत्त्व असल्याने गडहिंग्लजच्या बंदच्या हाकेला सर्वांनी प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. तसेच शिंदे यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीयांसह नागरिकांनी एकत्र येत जोवर यातील दोषींना अटक होत नाही, तोवर मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली. महेश कोरी, संतोष चिकोडे, महेश सलवादे, नागेश चौगुले आदींसह सर्वपक्षीयांनी कारवाईची मागणी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कोल्हापूरला पाठविण्यात आले. उद्योजक शिंदे यांनी पत्नी व मुलासह जीवनयात्रा संपविल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. यातील आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा अशा प्रवृत्ती बळावतील अशा प्रतिक्रिया उमटल्या. (Kolhapur News)
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकार्यांनी प्राथमिक तपासात संतोष शिंदे यांनी आधी पत्नी व मुलाचा गळा चिरुन त्यांना संपविल्यानंतर स्वतःचेही जीवन संपविले असल्याचे सांगून बेडरुममध्ये विषसदृश बाटली व चिठ्ठीही आढळल्याचे सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होईल, असे स्पष्ट केले.
हे ही वाचा :