कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेवेळी सत्तारूढ आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांत शुक्रवारी जोरदार राडा झाला. प्रवेशासाठी लावलेल्या बॅरिकेडस्वरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत अक्षरश: धुमश्चक्री आणि हाणामारी झाली. काहींनी बॅरिकेडिंग तोडले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील पशुखाद्य कारखान्याच्या आवारात सभा आयोजित केली होती. सभेसाठी दोन्ही गटांकडून तयारी केली होती. पाटील व महाडिक गटांतील राजकीय संघर्ष टोकाचा असल्यामुळे दोन्ही गटांच्या समर्थकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सभास्थळी जाण्यासाठी बॅरिकेडिंग उभारून प्रवेश मार्ग उभारला होता. सकाळपासून सभासद येत होते. त्यांना ओळखपत्र पाहूनच सभामंडपात प्रवेश दिला जात होता. यामुळे सभासदांना काही वेळ रांगेत थांबावे लागत होते. दुपारी बाराच्या सुमारास महाडिक समर्थक सभास्थळी येऊ लागले. दोन्ही गट आमने-सामने आले, त्यातच आत सोडणार्या प्रवेशद्वारावर गर्दी वाढल्याने वादावादीला सुरुवात झाली.
बराच वेळ रांगेत थांबूनही प्रवेश मिळत नसल्याचा आरोप करीत महाडिक गटाचे कार्यकर्ते बॅरिकेडिंग तोडून सभास्थळी घुसू लागले. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. एकमेकांना बघून घेण्याची भाषाही केली जात होती. यातच काही कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. काहींनी मंडपाचे पडदेही फाडले. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोेलिस करीत होते. मात्र, कार्यकर्ते आणखीच आक्रमक होत होते.
आ. सतेज पाटील यांचे पोस्टर घेऊन त्यांचे समर्थक घोषणा देत होते, तर महादेवराव महाडिक, खा. धनंजय महाडिक, अमल महाडिक व शौमिका महाडिक यांचे पोस्टर घेऊन त्यांचे समर्थक घोषणा देत होते. पाटील व महाडिक यांच्यातील टोकाचा सघर्ष कार्यकर्त्यांमध्येदेखील पाहावयास मिळाला. त्यामुळे वातावरणातील तणाव वाढत होता. पोलिस हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला घेत होते. दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली आणि यानंतर मात्र हा राडा थांबला.
बोगस सभासद आणले : महाडिक
सभेला बोगस सभासद पुढे आणून बसविले होते. त्यामुळे मूळ सभासदांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही, असा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला.
सभेसाठी गुंड आणले : आ. पाटील
'गोकुळ'च्या सभेत गोंधळ घालण्याचा विरोधकांचा डाव होता. त्यासाठी महाडिकांनी गुंड आणले होते, असा आरोप आ. सतेज पाटील यांनी केला.
हेही वाचा :