गुडाळ: नुकतीच निवडणूक झालेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन- व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक १ डिसेंबररोजी दुपारी १ वाजता होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली भोगावतीच्या प्रधान कार्यालयात ही बैठक होईल. Bhogavati Sugar Factory
भोगावती कारखान्यावर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार -पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला २५ पैकी २४ जागा मिळाल्या आहेत. Bhogavati Sugar Factory
चेअरमनपद काँग्रेसकडे, तर व्हाईस चेअरमनपद मित्र पक्षाकडे देण्यात येणार आहे. आ. पी. एन. पाटील चेअरमन पद राधानगरीत देणार की करवीरमध्ये देणार यावर व्हाईस चेअरमनपद कोणत्या मित्र पक्षाकडे जाणार, हे निश्चित होणार आहे. चेअरमनपदाचे प्रबळ दावेदार माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांचा पराभव झाल्याने चेअरमन पदाचे दावेदार वाढलेले आहेत. राधानगरीतून ज्येष्ठ संचालक हिंदुराव चौगले, प्रा. ए. डी. चौगले, धीरजसिंह डोंगळे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. प्रथम क्रमांकाने निवडून आलेले गुडाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आघाडीने चेअरमन पदाची संधी द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. गत पंचवार्षिकमध्ये त्यांचे वडील ए. डी. पाटील यांना उपाध्यक्ष निवडीत अंतिम क्षणी डावलल्याची सल पाटील समर्थकांना आहे.
करवीरमधून बी. ए. पाटील, प्रा. एस. ए. पाटील यांच्यासह ज्येष्ठ संचालक डी. आय. पाटील हेही चेअरमन पदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. व्हाईस चेअरमन पदासाठी शेकाप मधून ज्येष्ठ नेते केरबा भाऊ पाटील आणि माजी संचालक दत्तात्रय हनमंत पाटील हे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी उपाध्यक्ष रघुनाथ जाधव, ज्येष्ठ संचालक नंदूभाऊ पाटील आणि राजाराम कवडे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते.
चेअरमन- व्हाईस चेअरमन पदाची नावे निश्चित करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांची ३० नोव्हेंबररोजी बैठक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा