राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : भोगावतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना याच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा पगार, बोनससाठी संप सुरु होता. पण नुतन संचालकांनी आज (दि. २२) प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी स्ववर्गणी काढुन कामगारांच्या पगारांचा प्रश्न तात्पुरता मार्गी लावला.
कारखान्याचा हंगाम सुरु होण्याच्या काळातच पगार आणी बोनससाठी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यापासून संप सुरु होता. यादरम्यान निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्याने यावर निर्णय झाला नाही अन् निर्णय घेणे अवघड बनले होते. प्रशासक म्हणून कार्यकारी संचालकांना धाडसी निर्णय घेणे अडचणीचे ठरत होते.
निवडणुक झाली पुन्हा आमदार पी.एन.पाटील, संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सतेत आली. आज नुतन संचालकांनी संपाच्या ठिकाणी जाऊन थेट कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, अर्थिक स्थिती सांगून अर्थिक तरतुद नसल्याचे सांगितले व फुल ना फुलाची पाकळी म्हणून सर्व संचालकांनी स्ववर्गणी जमा करुन वर्गणी जमा करून त्यांना फूल ना फुलाची पाकळी देण्याचे आश्वासन दिले आणि संप मिटला. प्रत्येक संचालक मंडळाने पाच ते दहा लाख रुपये वर्गणी जमा करायची आणि यातून कायम कामगारांना 5000′ हंगामी कामगारांना 4000 आणि रोजंदारी लोकांना 2000 द्यायचे असा सकारात्मक निर्णय झाला, अन् कर्मचाऱ्यांच्या हाताला गती मिळाली. बोनस आणि पगाराबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर निर्णय घेऊ असा संचालक मंडळांने तोडग्याचा शब्द कर्मचार्यांना दिल्याचे समजते.