Latest

सांगली : भीषण अपघातात कार चारशे फुटांवर जाऊन आदळली, कोल्हापूरचे डॉ. अरूण मोराळे जागीच ठार

अविनाश सुतार

नागज, पुढारी वृत्तसेवा : भरधाव निघालेली कार पलटी होऊन झालेल्या अपघातात  डॉ. अरूण राजाराम मोराळे (वय ६६, रा. एसएससी बोर्ड, रिंग रोड, मनिषानगर, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी, डॉ. मोराळे हे आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात (१०८ रूग्णवाहिका) झोनल मॅनेजर होते. दरम्यान ते शुक्रवारी सकाळी कार (क्र.एम.एच.०९ डी.एक्स.४६४४) ने कोल्हापूरहून लातूरला मिटिंगला निघाले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर विठ्ठलवाडीजवळ भरधाव निघालेली कार दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ढिगाऱ्यावरून दोनदा पलटी होऊन सुमारे चारशे फुटांवर रस्त्याच्या उजव्या बाजूला विरूद्ध दिशेला तोंड करून उभारली. कारमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या डॉ. मोराळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची कवटी फटली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. तर कारचा चालक सोहेल सलीम शेख (वय २९, रा. कोल्हापूर) यालाही किरकोळ इजा झाली आहे.

मृत डॉ. मोराळे हे मूळचे बार्शीचे असून ते कुटुंबियासह कोल्हापूरला राहायला होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेत आठ जिल्ह्याचे झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मिटिंगच्या निमित्ताने ते लातूरला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असून तिघेही डॉक्टर आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

उधवस्त झालेलं तळीये गाव आता कुठल्या अवस्थेत आहे?

SCROLL FOR NEXT