Latest

कोल्हापूर: बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लांबणीवर: ३० सप्टेंबरनंतर घेण्याचे सहकार विभागाचे आदेश

अविनाश सुतार

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : बिद्री (ता.कागल, जि. कोल्हापूर) येथील दूधगंगा -वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असा आदेश सहकार विभागाने आज (दि. 2) दिले. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रकाश आबीटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्याकडे नुकतीच केली होती. राधानगरी- भुदरगड तालुक्यात पावसाचे प्रमाण जादा असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.  त्यानुसार निवडणूक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने दि. १५ फेब्रुवारी २०२३ च्या आदेशान्वये दि. १ एप्रिल २०२१ ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी  जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांनी दूधगंगा वेदगंगा कारखान्याच्या निवडणुकीसाठी  प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादी अनुक्रमे दि. २१ एप्रिल २०२३ व दि. १७ मे २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्रांच्या छाननी दि. १२ जून २०२३ तर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप या सर्व प्रक्रिया पूर्ण करून साधारण मतदानाचा दि. ९ जुलै २०२३ असा होता.

दरम्यान, कारखाना कार्यक्षेत्राच्या परिसरामध्ये ७ जूननंतर मान्सूनच्या पावसाला सुरूवात होते. त्यानंतर  साधारणपणे पुढील ३ ते ४ महिने या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे महापूर सदृष्य परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन पुर्णपणे विस्कळीत होते. त्याचबरोबर शेतकरी खरीप हंगामाच्या मशागतीमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे  या सर्व भौगोलिक परिस्थितीचा निवडणूक कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास अनेक अडचणी उद्भवू शकतात.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम १५७ अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारात कलम ७३ क मधील तरतूदीला सूट देऊन दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्यावर असेल. त्या टप्प्यावर या आदेशाच्या दिनांकापासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असे नमुद करण्यात आले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT