Latest

कोण आहे Shamar Joseph? ज्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची केली दांडी गुल!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कुटुंबाचा उपजीविकेसाठी त्‍याला बांधकाम मजूर म्‍हणून काम करावे लागले. यानंतर १२ तास सिक्‍युरेटी गार्ड म्‍हणुन त्‍याने नाेकरी केली. आठवड्यातून एकदा रविवारी क्रिकेट खेळणे ही त्‍यांच्‍यासाठी एक विलक्षण आनंद देणारी गोष्‍ट होती. प्रतिकूल परिस्‍थितीला शरण न जाता त्‍याने संघर्षाचा मार्ग निवडला. अखेर वेस्‍ट इंडिज क्रिकेट संघात त्‍याला खेळण्‍याची संधी मिळाली. या संधीचे त्‍याने साेने केले आणि  काही महिन्‍यांपूर्वी एक सिक्‍युरेटी गार्ड म्‍हणून ओळख असणार्‍या शमर जोसेफ (Shamar Joseph) या नावाची दखल दखल संपूर्ण क्रिकेट विश्‍वाला घेणे भाग पडलं. जाणून घेवूया गाबा कसोटी वेस्‍ट इंडिजच्‍या विजयाचा शिल्‍पकार ठरलेला वेगवान गोलंदाज शमर जोसेफ याच्‍याविषयी…

क्रिकेटमधील जगज्‍जेता, असे बिरुद मिरवणार्‍या ऑस्‍ट्रेलिया संघाला वेस्‍ट इंडिजने रविवार ( दि. २८ जानेवारी) धुळ चारली. तब्‍बल २७ वर्षांनंतर वेस्‍ट इंडिज संघाने ऑस्‍ट्रेलियाला त्‍यांच्‍याच मैदानावर कसोटी सामन्‍यात मात दिली. या ऐतिहासिक विजयाचा शिल्‍पकार ठरला वेस्‍ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफ. त्‍याने ११.५ षटकांमध्‍ये ७ विकेट घेत ऑस्‍ट्रेलिया संघाचा विजयाचा घास हिरावला.

Shamar Joseph : झाडावरील फळ हेच त्‍याच्‍यासाठी चेंडू…

शमर जोसेफ हा मूळचा गयानामधील बाराकारा या ४०० लोकसंख्‍या असणार्‍या दुर्गम गावातील रहिवासी. त्‍याच्‍या गावाला जाण्‍यासाठी बोटीने किमान दोन दिवस लागतात. २०१८पर्यंत त्‍याच्‍या गावात मोबाईल फोन किंवा इंटरनेट सेवा नव्‍हती. झाडावरील फळ हेच त्‍याच्‍यासाठी चेंडू होता. गोलंदाजीच्‍या सरावासाठी त्‍याने कधीकधी वितळलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून गोळे बनवले.

बांधकाम मजूर ते वेस्‍ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज

शमर जोसेफ रोजगाराच्‍या न्यू ॲमस्टरडॅम शहरात गेला. सुरुवातीला बांधकाम मजूर म्हणून त्‍याने काम केले. यानंतर सिक्‍युरेटी गार्ड (सुरक्षा रक्षक) म्हणून १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम केले. दररोज १२ तास काम करणार्‍या शमरला फक्त रविवारीच सुटीच्‍या दिवशी क्रिकेट खेळण्याची संधी मिळायची. यानंतर त्‍याने पूर्णवेळ क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्‍याचा निर्णय घेतला.  त्‍याच्‍या कठोर परिश्रमाला वेस्‍ट इंडिजच्‍या माजी खेळाडूंचे पाठबळ लाभले. वेस्‍ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाजी कर्टली ॲम्ब्रोस यांनी त्‍याच्‍या गोलंदाजाची प्रशंसा केली. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्‍याचे त्‍याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर त्‍याने कधीच मागे वळून पाहिले नाही. वेस्‍ट इंडिजकडून ॲडलेड कसोटीत त्याच्या कसोटी पदार्पणात 11 धावा आणि त्यानंतर पाच बळी मिळवले होते.

Shamar Joseph : केवळ ११.५ षटकामध्‍ये ७ विकेट

गब्बा कसोटीत कसोटीच्‍या चौथ्‍या दिवशी मिचेल स्टार्कच्या चेंडूचा फटका बसल्याने शमर जखमी झाला होता. त्‍याला मैदान सोडून रुग्णालयात जावे लागले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांची गरज होती. शमर जोसेफ पुन्‍हा मैदानात उतरला . एक संस्मरणीय स्पेल टाकत त्‍याने केवळ ६८ धावांत ७ बळी घेतले. त्‍याच्‍या या लक्षवेधी कामगिरीमुळे २७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कांगारू संघाचा पराभव करून वेस्‍ट इंडिजने इतिहास रचला.

जोसेफच्‍या कामगिरीने दिग्‍गज क्रिकेटपटूही भारावले..

जोसेफच्‍या कामगिरीने दिग्‍गज क्रिकेटपटूही भारावले आहेत. रविवारी सामना जिंकल्‍यानंतर वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा, कार्ल हूपर यांनी आनंदाश्रूंनी हा ऐतिहासिक विजय साजरा केला. आजचा दिवस वेस्‍ट इंडिज क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे, असे लारा याने सांगितले.

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्‍या 'X' वरील पोस्टमध्‍य म्‍हटलं आहे की, "जोसेफचा 7 विकेट्स घेण्याचा विलक्षण स्पेल कसोटी क्रिकेट खेळातील धैर्य आणि थरार यावर प्रकाश टाकतो. कसोटी क्रिकेट हे खरोखर आव्हानात्‍मक आहे. हा प्रकार खेळाडूचे कौशल्य दाखवते. 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय पटकावणार्‍या विजयचा प्रमुख शिल्पकार ठरला जोसेफ."

माझ्या डोळ्यात अश्रू आले….

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या 'X' वरील पोस्टने क्रिकेटप्रेमी जोसेफबद्दल इंटरनेटच्‍या माध्‍यमातून अधिक जाणून घेण्‍याचे आवाहन केले आहे. डिव्हिलियर्सने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "स्वतःवर एक उपकार करा, विकिपीडियावर जोसेफच्‍या जीवनाबद्दल वाचा! त्याच्या प्रवासाबद्दल वाचताना अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले. अत्‍यंत प्रेरणादायी,"

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT