Latest

KL Rahul miss WTC Final : केएल राहुलच्या मांडीवर होणार शस्त्रक्रिया, डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul miss WTC Final : डब्ल्यूटीसीच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याने स्वतः याबाबत घोषणा केली आहे. राहुलच्या मांडीला दुखापत झाली असून त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचेही त्याने जाहीर केले आहे. इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे त्याने ही माहिती दिली.

बीसीसीआयचे टेन्शन वाढले

आयपीएल 2023 चा निम्मा हंगाम संपला आहे. ही स्पर्धा संपत असताना टीम इंडिया आणि बीसीसीआयचे टेन्शन वाढत आहे. आयपीएलनंतर लगेचच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. जिथे टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. उभय संघांमधील हा सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. पण या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीशी झुंजत आहेत. (KL Rahul miss WTC Final)

नव्या खेळाडूची निवड करावी लागणार

1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यातील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना राहुलला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने मैदान सोडले होते. फलंदाजीदरम्यान तो 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आला पण त्यावेळी तो खूप अडचणीत दिसला.

अलीकडेच, राहुल दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेर पडल्याची बातमी आली होती. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाला त्याच्या जागी नव्या खेळाडूची निवड करावी लागणार आहे.

राहुलच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

राहुल दुखापतीमुळे डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी मयंक अग्रवालचा संघात समावेश केला जाऊ शकतो. केएल राहुल आणि मयंक अग्रवार खूप चांगले मित्र आहेत. दोघेही अनेक वर्षे आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळले आहेत. केएल आणि मयंक डावाची सुरुवात करण्यासाठी एकत्र यायचे. दोन्ही खेळाडू रणजीमध्येही कर्नाटक संघाकडून खेळतात. राहुलच्या अनुपस्थितीत मयंकला त्याचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. (KL Rahul miss WTC Final)

रणजीमध्ये मयंकची चमकदार कामगिरी

मयंक अग्रवालने 2022-23 च्या रणजी हंगामात अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने 13 सामन्यात 82.50 च्या सरासरीने 990 धावा केल्या. यादरम्यान अग्रवालने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. या मोसमात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाटक संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. मात्र, त्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी मयंक हा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत बीसीसीआय त्याच्या नावाचा विचार करू शकते.

काय म्हणाला केएल राहुल? (KL Rahul miss WTC Final)

राहुलने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलंय की, 'वैद्यकीय टीमशी सल्लामसलत केल्यानंतर, मी लवकरच मांडीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक कठीण निर्णय आहे, परंतु फिट होण्यासाठी आणि पुन्हा मैदानात उतरण्याच्या दृष्टीने हे पाऊल योग्य आहे असे मला वाटते. मी पुढच्या महिन्यात टीम इंडियासोबत ओव्हलवर नसल्यामुळे खूप निराश आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी मी जे काही करू शकतो ते करेन. देशासाठी खेळणे हे नेहमीच माझे लक्ष आणि प्राधान्य राहिले आहे.'

SCROLL FOR NEXT