नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरेंसाठी मुंबई पालिका हे एटीएम आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्या दिल्लीत असून त्यांचा संजय राऊतांसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरुच आहे.
दरम्यान, शिवसेना नेते व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली आहे. आयकर खात्याकडून ही कारवाई झाली आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेतील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. एवढे भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही ठाकरे गप्प का आहेत? असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. सोमय्यांनी यशवंत जाधवांवरही आरोप केले.