रत्नागिरी : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात टँकरचा अपघात | पुढारी

रत्नागिरी : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात टँकरचा अपघात

खेड; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-गोवा मार्गावरील भोस्ते घाटात गुरुवारी, दि. 7 रोजी पहाटे संरक्षक भिंतीवर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर उलटला. भोस्ते घाटात मोबाईल टॉवर जवळील वळणावर हा अपघात झाला. हा टँकर उंच भिंतीवर अडकून राहिल्याने चालकाचा जीव वाचला असला तरी या अपघातानंतर आता भोस्ते घाटातील हे वळण जीवघेणे व धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासूनच महामार्ग बांधकाम विभागाच्या तज्ज्ञ अभियंत्यांचे कामाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणे धोकादायक बनली आहेत. चौपदरीकरण अद्याप अपूर्ण असून काही ठिकाणी रस्ता चौपदरी करण्याची कामे अद्यापही सुरू आहेत.

खेडजवळील भोस्ते घाट हा आगामी कालावधीत जीवघेणा घाट म्हणून प्रसिद्ध होण्याची भीती आहे. या घाटातील मोबाईल टॉवर जवळील गोव्याहून मुंबईच्या दिशेला जाताना लागणारे वळण अपघाताचे ठिकाण ठरत आहे. गेल्या दोन वर्षांत शेकडो लहान मोठे अपघात या वळणावर झाले आहेत. याच ठिकाणी गुरुवारी, दि. 7 रोजी पुन्हा टँकरचा अपघात झाला आहे.

तीव्र उतार व वळण यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. यापूर्वी संरक्षक भिंतीवर वाहने आपटत होती. मात्र, गुरुवारी भोस्ते घाटात टँकर संरक्षक भिंतीवर सुमारे चार ते पाच फूट उंचीवर उलटला.

Back to top button