Latest

Kerala Women lottery News : वर्गणी गोळा करून खरेदी केले २५० रुपयांचे लॉटरी तिकीट, ११ महिलांना १० कोटींची लॉटरी!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : देव जेंव्हा देतो तेंव्हा 'छप्पर' फाडून देतो अशी एक म्हण आहे. ही म्हण केरळच्या ११ महिलांना लागू होत आहे. केरळमधील ११ महिलांनी २५० रुपयांचे लॉटरीचे तिकीट वर्गणी काढून खरेदी केले होते. या तिकीटाला १० कोटींचा जॅकपॉट मिळाला आहे. (Kerala Women lottery News)

हे तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून त्या महिलांनी आपसात वर्गणी का़ढून हे तिकीट विकत घेतले. मलप्पुरमच्या परप्पनगडी नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या हरितकर्म सेनेच्या सदस्य असलेल्या ११ महिलांनी स्वप्नातही लॉटरी जिंकण्याचा विचार केला नसावा. या महिला उदरनिर्वाह करण्यासाठी हरितकर्म सेनेचे सदस्य म्हणून काम करतात. यातून मिळणारे तुटपुंजे वेतन हेच ​​त्यांच्या कुटुंबाचे एकमेव उत्पन्न आहे.  (Kerala Women lottery News

११ महिलांमधील राधा म्हणाल्या, "आम्ही यापूर्वीही पैसे जमा करून लॉटरीची तिकिटे खरेदी केली आहेत. पण, लॉटरी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरी सदस्य म्हणाली की, आम्ही सोडतीची आतुरतेने वाट पाहत होतो. मग कोणीतरी कळवले की शेजारच्या पलक्कडचा तिकीट क्रमांक विजेता घोषित झाला आहे.

आम्ही सर्व निराश झालो. पण नंतर जेव्हा आम्हाला कळले की, आमच्या तिकिटाला पहिला क्रमांक देण्यात आला, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या जीवनात अडचणींचा सामना करत आहोत. लॉटरीत जिंकलेले पैसे आमच्या समस्या सोडविण्यास मदत करतील.

हरिता कर्म सेना घरोघरी आणि आस्थापनांमधून जैवविघटन न होणारा कचरा गोळा करण्याचे काम करते. जी श्रेडिंग युनिट्समध्ये पुनर्वापरासाठी पाठवली जाते. नगरपालिकेतील हरित कर्म सेना संघाच्या अध्यक्षा शीजा म्हणाल्या की, यावेळी सर्वात पात्र लोकांवर महिला भाग्याचा वर्षाव झाला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, सर्व लॉटरी विजेते खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कुटुंबासाठी एकमेव कमावते सदस्य आहेत. काहींना मुलींची लग्ने करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय खर्च उचलावा लागतो. जीवनाच्या समस्यांशी लढा देत ते अत्यंत साध्या घरात राहत आहेत. बंपर लॉटरी विजेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी (दि.२७) येथील महापालिका गोडाऊन परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT