Latest

Aashiqui 3 : कन्फर्म! कार्तिक आर्यन दिसणार मुख्य भूमिकेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्तिक आर्यनचा 'भूलभुलैया-२' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट त्याच्या झोळीत येत आहेत. कार्तिक आर्यन हा क्रिती सेननसोबत 'शेहजादा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. (Aashiqui 3 ) अलीकडेच त्याने कियारा अडवाणीसोबत 'सत्यप्रेम की कथा'चे शूटिंग सुरू केले आहे. याबाबतची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. 'आशिकी' आणि 'आशिकी२' हे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले आहेत. आता 'आशिकी-३' ची तयारी सुरू झाली आहे. (Aashiqui 3 ) आशिकी ३ मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी, या चित्रपटासाठी अद्याप अभिनेत्रीची घोषणा करण्यात आलेली नाही. आशिकी ३ चे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत.

आशिकी ३ बद्दल कार्तिक आर्यन म्हणतो, 'आशिकी हा असा चित्रपट आहे, जो पाहत मी मोठा झालो आहे. आशिकी ३ मध्ये काम करणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. भूषण कुमार आणि मुकेश भट्ट यांच्यासोबत काम करण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. अनुराग बसू यांच्या कामाचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळेल.

अनुराग बसूनेही आशिकी ३ बद्दल आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, आशिकी आणि आशिकी २ साठी चाहत्यांच्या भावना आजही त्यांच्या हृदयात आहेत. कार्तिक आर्यन सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट असेल जो त्याच्या कामासाठी समर्पण, मेहनत, संयम आणि दृढनिश्चय यासाठी ओळखला जातो.

१९९० मध्ये आलेला आशिकी चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. तो टी-सीरीज आणि विशेष फिल्म्सने रिलीज केला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर दोघेही रातोरात प्रसिद्ध झाले. यानंतर २०१३ साली मोहित सुरी दिग्दर्शित आशिकी २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

SCROLL FOR NEXT