Latest

कर्नाटक विधान परिषद : बेळगावात ‘बसक्या बैला’चा हिसका, भाजपला ठसका

अमृता चौगुले

बेळगाव; पुढारी ऑनलाईन : प्रकाश हुक्केरी (Prakash Hukkeri) म्हणजे बसका बैल आहे, त्यांच्या हातून आता काही होणार नाही, अशी टीका बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. कर्नाटक विधान परिषद निवडणूक प्रचारात भाजपचे उमेदवार अरुण शहापूर वयाने तरुण असल्यामुळे त्यांच्यासमोर पंच्याहत्तरी पार केलेल्या प्रकाश हुक्केरींवर टीका करताना कारजोळ यांची जीभ घसरली होती. स्वतः गोविंद काजोळ यांनी सत्तरी पार केली आहे. याचा विसर त्यांना पडला असेल. मात्र या बसक्या बैलाने आता भाजपला ठसका लावला आहे. दोन वेळचे विधान परिषद आमदार अरुण शहापूर यांना पराभूत करून त्यांची हॅटट्रिक हुकवताना स्वतः प्रकाश हुक्केरी यांनी विधान परिषदेत पहिल्यांदाच एंट्री केली आहे.

मुख्यमंत्र्यांसह सुमारे आठ मंत्र्यांनी केलेला प्रचार; बेळगाव, विजापूर, बागलकोट या तिन्ही जिल्ह्यात असलेला भाजपचा प्रभाव, तिन्ही जिल्ह्यात मिळून असलेले चार मंत्री, असा कडवा विरोध मोडून काढत प्रकाश हुक्केरी यांनी भाजपवर मात केली आहे. हुक्केरी यांचा हा विजय काँग्रेस विरुद्ध भाजप असा आहेच, शिवाय दोन वेळचे आमदार अरुण शहापूर विरुद्ध माजी मंत्री असाही होता. त्यात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील एक दिग्गज काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी यांनी बाजी मारली. (कर्नाटक विधान परिषद )

मुळात प्रकाश हुक्केरी यांनी विधानसभा आणि लोकसभा सोडून विधान परिषदेच्या आखाड्यात यायलाच नको, असे बऱ्याच जणांचे मत होतं. मात्र हुक्केरी हे कसलेले राजकारणी आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन उडी घेतली होती. मात्र मतदारांनी विधानसभेचा कौल लोकसभेला उलट करताना त्यांचे प्रतिस्पर्धी अण्णासाहेब जोल्ले यांना लोकसभेला पाठवले. त्यामुळे गेली तीन वर्षे प्रकाश हुक्केरी देशातल्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. ती कसर भरून काढण्यासाठीच हुक्केरी यांनी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि आज तो पूर्णत्वास नेला. (कर्नाटक विधान परिषद )

लोकांची कामे करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही, असे म्हटले जाते. दोन वेळचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार अरुण शहापूर यांचीही तशीच ओळख होती. मात्र दोघांच्याही कार्यशैलीत विलक्षण फरक होता. हुक्केरी हे वयाने जास्त असल्यामुळे शिक्षक अथवा लोकांशी ते अरे, जा रे या भाषेत बोलतात. मात्र अरुण शहापूर वयाने लहान असल्याने ते शिक्षकांची अहो जाहो, असेच बोलतात. जाहीर प्रचारात हाही मुद्दा होता. तुम्हाला अहो सर म्हणणार आमदार हवा ही अरे सर म्हणणारा आमदार हवा असेही विचारले जात होते.

हुक्केरींविरुद्ध प्रचार करताना ते मॅट्रिक फेल विद्यार्थी आहेत, असे सांगितले गेले होते. हे खरे मानले तर तेच मॅट्रिक फेल विद्यार्थी आज शिक्षकांचे प्रतिनिधित्व विधान परिषदेत करणार आहेत. थोडक्‍यात भाजपचा कुठल्याही प्रभावशाली प्रचाराचा या निवडणुकीवर परिणाम झाला नाही, असे दिसते.

SCROLL FOR NEXT