Latest

कर्नाटक निवडणूक : चार सख्खे भाऊ बनले आमदार

मोहन कारंडे

बेळगाव : अंजर अथणीकर : एखाद्या घरात दोन व्यक्ती आमदार किंवा खासदार झाल्यास त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. याला मात्र जारकीहोळी बंधू अपवाद ठरले आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे निवडून आले आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू लखन जारकीहोळी हे यापूर्वीच अपक्ष म्हणून विधान परिषदेचे आमदार आहेत. तिघेही बंधू चारहून अधिकवेळा निवडून आल्याने सत्ता कोणत्याही पक्षाची येवो लाल दिव्याची गाडी जारकीहोळी घराण्याला ठरलेलीच आहे.

रमेश जारकीहोळी गोकाक मतदार संघातून सातव्यांदा निवडून आले आहेत. 1999 ते 2018 पर्यत त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळच्या पोटनिवडणुकीत त्यांनी यश मिळवले. आता सातव्यादाही त्यांनी विजयश्री मिळवली आहे. त्यांचे बंधू सतीश जारकीहोळी दोनवेळा निजदकडून विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांनी 2006 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2008 पासून यमकनमर्डी मतदार संघातून सलग चौथ्यांदा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. भालचंद्र जारकीहोळी यांचा राजकीय प्रवासही निजदकडून सुरु झाला. 2004 आणि 2008 मध्ये त्यांनी अरभावी मतदार संघातून विजय मिऴवला. 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपतर्फे पोटनिवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर भाजपच्यावतीने त्यांनी सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्यामुळे सलग पाचवेळा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

कनिष्ठ बंधू असलेले लखन जारकीहोळी यांनी या आधी 2019 साली त्यांचे बंधू रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी घेतली होती. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर रमेश आणि लखन हे एकत्र आले आणि त्यांनी सतीश जारकीहोळी यांना लोकसभेसाठी विरोध केला. या निवडणुकीत सतीश जारकीहोळी यांचा पराभव झाला. यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत लखन यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यावेळी सर्व जारकीहोळी बंधूंनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन लखन यांना आमदार केले. एकाच घरातील चार सख्खे भाऊ आमदार असणे ही देशातील पहिलीच घटना आहे. रमेश, सतीश आणि भालचंद्र जारकीहोळी यांनी यापूर्वी मंत्री म्हणून केले आहे. रमेश आणि सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे. जारकीहोळींचा पाचवा भाऊ भीमसी जारकीहोळी हे कारखानदार आहेत. जारकीहोळी बंधूंना फोडण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अनेकदा झाला आहे. मात्र, आतापर्यंत त्यांना यामध्ये यश आलेले नाही.

सतीश जारकीहोळी यांचे मंत्रिपद निश्चित

आ. सतीश जारकीहोळी यांचं राहणीमान अत्यंत साधे आहे. पण, काँग्रेसच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. आताच्या निवडणुकीत ते चौथ्यांदा निवडून आल्याने त्यांची महत्त्वाच्या मंत्रिपदावर नियुक्ती निश्चित मानली जात आहे. इतकेच काय सिद्धारमय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासोबत सतीश जारकीहोळी हे मुख्यमंत्रीपदाचेही प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत प्रभाव

जारकीहोळी बंधूंचा बेळगाव जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. गोकाक, यमकनमर्डी, आरभावी या मतदारसंघांसोबत बेळगाव ग्रामीण, अथणी, कागवाड, निपाणी, बेळगाव ग्रामीण या मतदारसंघावरही त्यांचा प्रभाव आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT