Latest

Kane Williamson : विल्यमसनच्या स्पोर्ट्समन स्पिरिटने क्रिकेट चाहते भारावले (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kane Williamson : टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज (दि. 1) ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 20 षटकांत 6 गडी बाद 179 धावा केल्या. याचबरोबर न्यूझीलंडला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य मिळाले.

इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याचा सहकारी सलामीवीर अॅलेक्स हेल्सने 52 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने 20 धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बेन स्टोक्स आठ, हॅरी ब्रूक सात आणि मोईन अली पाच धावांचे योगदान देऊन माघारी परतले. सॅम कुरनने नाबाद सहा आणि डेव्हिड मलानने नाबाद तीन धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम साऊदी, मिचेल सँटनर आणि ईश सोधीला प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचे (Kane Williamson) स्पोर्ट्समन स्पिरिट पहायला मिळाले. त्याच्या या एका कृतीने प्रेक्षकांसह क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. झाले असे की, पॉवरप्लेचे शेवटचे षटक मिचेल सँटनर फेकत होता. चौथा चेंडू त्याने शॉर्ट ऑफ गुड लेंथ टाकला. बटलरने बॅकफूटवर जात 30-यार्ड वर्तुळाच्या वरून हा चेंडू फटकाण्याचा प्रयत्न केला. पण, तो चुकला. कव्हरवर उभा असलेला केन विल्यमसन चेम्डूच्या दिशेने झेपावला आणि झेल पकडला. आपण झेलबाद झालो असे वाटून बटलर पॅव्हेलियनकडे जाऊ लागला. त्यानंतर विल्यमसनने ग्राउंड अंपायरला थर्ड अंपायरकडून मी पकडलेला झेल तपासण्यास सांगितले. यावेळी रिप्लेमध्ये विल्यमसनने (Kane Williamson) डायव्ह मारताना चेंडूने जमीनीला स्पर्श केल्याचे आढळले. यामुळे तिस-या पंचांनी बटलर बाद नसल्याचा निर्णय दिला. याबरोबरच पुढे बटलरने आपले 18 टी 20 अर्धशतक पूर्ण केले.

SCROLL FOR NEXT