Latest

Kane Williamson : कॅप्टनसी सोडताच विल्यमसन आला रंगात! पाकविरुद्ध शतक ठोकून 722 दिवसांचा संपवला दुष्काळ

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kane Williamson : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कराची येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या किवींनी यजमान संघाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात केलेल्या 438 धावांना प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने 6 गडी गमावून 440 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम (113) आणि माजी कर्णधार केन विल्यमसन (105*) यांनी शतके झळकावली. त्याचवेळी डेव्हॉन कॉनवे (92) अर्धशतक फटकावले.

डेव्हन कॉनवेचे शतक हुकले

न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी बिनबाद 165 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे या जोडीने डावाला चालना दिली पण कॉनवे 183 धावांवर बाद झाला. त्याला शतक पूर्ण करता आले नाही. नुमान अलीने कॉनवेला एलबीडब्ल्यू केले. यानंतर माजी कर्णधार केन विल्यमसन फलंदाजीला आला आणि त्याने वेळ न घेता खेळपट्टीवर आपले पाय रोवले.

लॅथमचे शानदार शतक

विल्यमसन (Kane Williamson) आणि लॅथमने डावाची आघाडी घेतली. दरम्यान, लॅथमने 161 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. मात्र 113 धावा केल्यानंतर अबरार अहमदने त्याला माघारी धाडले. यानंतर नुमान अलीने हेन्री निकोल्सला (22 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 272 धावांत 3 विकेट्स गमावल्यानंतर केन विल्यमसनने डॅरिल मिशेलसह आघाडी घेतली. या दोघांनी मिळून धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेली. 337 धावांवर अबरारने मिशेलला विकेटच्या मागे झेलबाद करून किवींना चौथा धक्का दिला. मिचेल 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडेलने विल्यमसनला साथ दिली आणि पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी करत धावसंख्या 5 बाद 427 पर्यंत नेली.

विल्यमसनचे 25 वे शतक

ब्लंडेल बाद झाल्यानंतर विल्यमसनने 206 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विल्यमसनचे हे पहिले आणि कारकिर्दीतील 25 वे शतक आहे. यापूर्वी, त्याने जानेवारी 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्धच शतक झळकावले होते. त्या डावात त्याने 238 धावा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी (722 दिवसांनी) त्याने शतकी आकडा गाठला आहे. अशातच विल्यमसनने कसोटी शतकांच्या बाबतीत ग्रेग चॅपेल, मोहम्मद युसूफ आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मागे टाकले. तसेच सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हक आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. विल्यमसनचे शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेसवेल 5 धावांवर बाद झाला. अबरारने त्याची विकेट घेतली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 6 गडी गमावून 440 धावा केल्या आणि पहिल्या डावात 2 धावांची आघाडी घेतली.

विल्यमसनच्या पाकविरुद्ध 1000 हून अधिक कसोटी धावा

विल्यमसनच्या बॅटने पाकिस्तानविरुद्ध खूप धावा वसूल केल्या आहेत. त्याचे पाकिस्तानविरुद्धचे हे पाचवे शतक आहे. पाकविरुद्धच्या शेवटच्या 10 डावांबद्दल बोलायचे झाल्यास, केनची धावसंख्या 238, 21, 129, 139, 89, 30, 28*, 37 आणि 63 अशी आहे. विल्यमसन हा एकमेव किवी खेळाडू आहे ज्याने पाकिस्तानविरुद्ध 1000 हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत.

25 वे शतक झळकावणारा तो पहिला किवी फलंदाज (Kane Williamson)

न्यूझीलंडसाठी कसोटीत 25 शतकांचा टप्पा गाठणारा विल्यमसन हा पहिला खेळाडू ठरला. या बाबतीत रॉस टेलर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने कसोटीत 19 शतके झळकावली आहेत. टेलर आता निवृत्त झाला आहे. तर तिसऱ्या स्थानावर मार्टिन क्रो आहे, ज्यांच्या नावावर 17 शतके आहेत. क्रो हेही निवृत्त झाले आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेला टॉम लॅथम विल्यमसनशी टक्कर देऊ शकतो. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर लॅथमच्या नावावर 13 शतकांची नोंद झाली आहे.

सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल

विशेष म्हणजे केवळ 210 धावा करताच केन रॉस टेलरचा मोठा विक्रम मोडेल. टेलरने न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 7683 धावा केल्या आहेत. तर केनच्या बॅटमधून आतापर्यंत 7473 धावा आल्या आहेत. पुढील काही सामन्यात तो टेलरला मागे टाकेल यात शंका नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला केन विल्यमसनने न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला होता. त्याच्या जागी टीम साऊदी नवा कसोटी कर्णधार बनला आहे. तथापि, विल्यमसनने वनडे आणि टी-20 फॉर्मेटमध्ये संघाचे कर्णधारपद कायम ठेवेल आहे.

SCROLL FOR NEXT