पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल (TATA IPL 2022) मेगा लिलावात अनेक खेळाडूंना मोठ्या बोली लागल्या, पण ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांना कोणीही विकत घेतले नाही. झम्पा टी २० विश्वचषकातील अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये होता. यंदाच्या आयपीएलसाठी निवड न झाल्याबद्दल केन रिचर्डसनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रिचर्डसनने फिरकीपटू ॲडम झाम्पाला आयपीएलमध्ये (IPL) कोणत्याही संघाने विकत न घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. याशिवाय तो म्हणाला की, 'गेल्या वर्षी जेव्हा आम्ही कोरोनाच्या परिस्थितीमुळे आयपीएल (IPL) सोडत होतो, तेव्हा मी झाम्पाला सांगितले होते की हा निर्णय आपल्याला महागात पडू शकतो. त्यावेळी आम्हाला परत ऑस्ट्रेलियाला जायचे होते. आयपीएल आमच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. त्यामुळे मला अशी भावना होती की खरेदीदार आम्हाला खरेदी करताना सावधगिरी बाळगतील. कारण त्यांना वाटेले असणार की आम्ही पुन्हा येणार नाही. हेच कारण आहे असे मला वाटते,' असे त्याने सांगितले.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या रिचर्डसन आणि अॅडम झाम्पा यांनी भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आयपीएल स्पर्धा सोडून मायदेश गाठला होता. मात्र, नंतर बीसीसीआयने लीग पुढे ढकलली. ऑस्ट्रेलियाच्या या दोन खेळाडूंना यावेळी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.