Latest

kalaram Mandir : काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, भाजपपाठोपाठ आता काँग्रेसचीही कुरघोडी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अयोध्येत होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन व महाआरती करण्याचा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मंदिरात महाआरती करत ठाकरे गटाचा फियास्को केल्यानंतर महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेदेखील ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. येत्या २० जानेवारीला काँग्रेसतर्फे काळाराम मंदिरात महाआरती केली जाणार आहे. (kalaram Mandir)

येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळूनही अयोध्येला न जाण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. २३ जानेवारीला ठाकरे गटाचे नाशिकमध्ये महाअधिवेशन होत आहे. या निमित्ताने २२ जानेवारीला ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन होणार असून, ते या दिवशी काळारामाचे दर्शन तसेच गोदाआरती करणार असल्याचे ठाकरे गटातर्फे गेल्या महिन्यातच जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी या दौऱ्यादरम्यान काळारामाचे दर्शन घेत गोदाआरती केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील काळारामाचे दर्शन व गोदाआरती करत ठाकरे यांच्यावर टीका केली. आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली असून, संपूर्ण नाशिकची सजावट करण्याचा तसेच ठिकठिकाणी पक्षाचे होर्डिंग व विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काळाराम मंदिर दर्शन व गोदाआरतीवरून भाजप व ठाकरे गटात राजकीय स्पर्धा सुरू असताना आता काँग्रेसनेही त्यात उडी घेतली आहे. काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरेश मारू यांनी आपल्या पत्राद्वारे शनिवारी, दि. २० जानेवारी रोजी काळाराम मंदिर येथे महाआरतीचा निर्णय घेतला आहे. त्या मंदिराला असलेले ऐतिहासिक महत्त्व अयोध्या येथे रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेला ऐतिहासिक सत्याग्रह हे सर्व लक्षात घेत सर्वांना महाआरतीद्वारे अभिवादन केले जाणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT