Latest

Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह बनला नंबर १ कसोटी गोलंदाज, अश्विनला मागे टाकले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनला मागे टाकले आहे. गोलंदाजीत अव्वल स्थान मिळवणारा बुमराह हा भारताचा चौथा खेळाडू आणि पहिला वेगवान गोलंदाज आहे. यापूर्वी अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशन बेदी यांनी अशी कामगिरी केली होती.

भारताने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध १०६ धावांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. विशेष म्हणजे या कसोटीत बुमराहने ९ विकेट घेत धमाकेदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. भारताचा एक वेगवान गोलंदाज प्रथमच कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणे हा टीम इंडियासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे.

९ विकेट्स घेतल्याने बुमराहने दुसऱ्या कसोटीत सामनावीराचा पुरस्कार मिळवला आणि गोलंदाजांच्या ताज्या कसोटी क्रमवारीत तीन स्थानावरून प्रगती करत सहकारी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.

भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन गेल्या वर्षी मार्चपासून कसोटी क्रमवारीत अ‍व्वल स्थानी होता. आता इंग्लंडविरुद्ध नुकत्यात झालेल्या सामन्यात भारतासाठी त्याने तीन विकेट्स घेतल्या. त्या तुलनेत बुमराहची कामगिरी सर्वोच्च राहिली. यामुळे कसोटी गोलंदाजांच्या सुधारित क्रमवारीत अश्विनची दोन स्थानांनी घसरून होऊन तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने दुसरे स्थान कायम राखले आहे.

बुमराहने प्रथमच ICC क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. ३० वर्षीय बुमराहने ३४ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी एकूण १० वेळा ५ बळी घेतले असूनही त्याने यापूर्वी कधीही तिसऱ्यापेक्षा वरचे स्थान मिळवले नव्हते.

SCROLL FOR NEXT