Latest

Japan earthquakes | २० भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरले, ५ फूट उंच त्सुनामीच्या लाटा, रस्ते उखडले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : टोकियोपासून सुमारे ३०० किमी (१९० मैल) अंतरावरील नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी झालेल्या ७.६ तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपानंतर जपानने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. दरम्यान, इशिकावा येथील नोटोच्या किनारपट्टीवर पाच फूट उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. तसेच येथील नैसर्गिक आपत्तीमुळे ३२ हजारहून अधिक घरांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच महामार्ग बंद करण्यात आले आहेत. (Japan earthquakes)

२०११ मध्ये झालेल्या भूकंपानंतर हा पहिलाच त्सुनामीचा इशारा आहे. इशिकावाच्या वाजिमा येथील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या शक्तीशाली भूकंपामुळे रस्त्याला तडे गेले आहेत.

बुलेट ट्रेन सेवा थांबवण्यात आली आहे. तसेच प्रभावित भागात दळणवळण सेवा आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. जपान हवामान एजन्सी (JMA) च्या मते, इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांना भूकंपाचा धक्का बसला. त्यापैकी एकाची प्राथमिक तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ इतकी होती, असे असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

स्थानिक हवामान संस्थांच्या म्हणण्यानुसार, भूकंपानंतर इशिगावामधील नोटोमध्ये भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किमी परिसरात त्सुनामीच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

जपानमधील भूकंपाची सुरुवात ४:०६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) ५.७ तीव्रतेच्या धक्क्याने झाली. यानंतर ४:१० वाजता (स्थानिक वेळेनुसार) ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ४:१८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) ६.१ रिश्टर स्केलचा, ४.२३ वाजता ४.५ रिश्टर स्केलचा, ४.२९ वाजता ४.६ रिश्टर स्केल, ४:३२ वाजता (स्थानिक वेळ) ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, त्यानंतर लगेचच ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला.

लोकांनी किनारी परिसर सोडला

जपानी पब्लिक ब्रॉडकास्टर NHK नुसार, त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर इशिकावा येथील नोटोच्या किनारपट्टीवर ५ मीटरपर्यंतच्या लाटा आदळल्याने किनारपट्टीवरील लोकांना उंच ठिकाणी अथवा उंच इमारतीवर जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. एएफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, स्थानिक हवामान कार्यालयाने सांगितले की, ४.० तीव्रतेचे तब्बल २१ भूकंप नोंदवले गेले आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये भूकंपाच्या हादऱ्याने इमारती हालताना दिसत आहेत. तसेच रस्तेही उखडले आहेत. तर त्सुनामीच्या लाटांमुळे किनारपट्टी भागात पाणी तुंबण्याचा धोका आहे.

कोरियाकडून त्सुनामीचा इशारा

जपानच्या भूकंपानंतर उत्तर कोरियानेदेखील पूर्व किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला आहे. तसेच जपानमधील भारतीय दूतावासाने तीव्र भूकंप आणि त्सुनामीच्या इशाऱ्यांनंतर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT