Latest

JDU ची मोठी कारवाई, नागालँडमधील पक्षाची राज्य समितीच केली बरखास्त, जाणून घ्या कारण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) (Janata Dal (United) ने नागालँडमध्ये मोठी कारवाई केली आहे. जेडीयूने त्यांच्या पक्षाची नागालँड राज्य समिती तात्काळ प्रभावाने बरखास्त केली आहे. पक्षाच्या नागालँड प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय स्तरावरील पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत न करता नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याचे पत्र दिले होते. यावर आक्षेप घेत जेडीयूने पक्षाची राज्य समितीच बरखास्त केली आहे.

जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस अफाक अहमद खान यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या पक्षाच्या नागालँड प्रदेशाध्यक्षांनी जेडीयूच्या केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत न करता नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. ही कृती उच्च अनुशासनहीनता आणि मनमानी स्वरुपाची आहे. यामुळे जेडीयूने नागालँडमधील पक्षाची राज्य समिती तात्काळ प्रभावाने बरखास्त केली आहे.

JDU पक्षाध्यक्ष आणि एकमेव आमदाराने घेतली मुख्यमंत्री रिओ यांची भेट

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, नागालँड जेडीयूचे अध्यक्ष सेन्चुमो लोथा आणि त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार ज्वेंगा सेब यांनी ८ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी एनडीपीपी-भाजप युती सरकारला पाठिंबा देणारे पत्र सादर केले. त्यांनी ही माहिती फोनवरून इंग्रजी वृत्तपत्रालाही दिली. ज्यामध्ये त्यांनी नागालँडमधील स्थानिक समस्या लक्षात घेऊन आम्ही रिओ सरकारला पाठिंबा दिला असल्याचे म्हटले होते.

नागालँडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ६० सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत JDU ने केवळ एक जागा जिंकली होती. नागालँडमधील पक्षाच्या एकमेव आमदाराने पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत न करता एनडीपीपी-भाजप युती सरकारला पाठिंबा दिल्याने जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पेच सहन करावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश यांनी गेल्या वर्षी भाजपशी साथ सोडून राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते.

नागालॅंडमध्ये मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या नेतृत्वाखालील 'एनडीपीपी'ने २३ जागा जिंकल्या असून, भाजपने १२ जागांवर बाजी मारली आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागा जिंकल्या असून, तो दुसरा मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे त्याला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आणले आहेत. टूएनसंद सदर – 2 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तिचोबा आणि नोकसेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिया ओनेने चॅग हे विजयी झाले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आठ उमेदवार उभे केले होते.

शरद पवार यांनी भूमिका केली स्पष्ट

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने एनडीपीपी-भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी विरोधी बाकावर असताना नागालँडमध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीवर जोरदार टीका झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली टाकत, राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजप सरकारला नसून तिथल्या मुख्यमंत्र्यांना असल्याचे स्पष्ट केले. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपशी युती केली नसल्याचाही खुलासाही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT