पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत कुलदीप यादवची विकेट घेत इतिहास रचला आहे. कुलदीप यावादच्या रूपाने त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 700 वा बळी टिपला. यासह अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळींचा टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज तर एकूण जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. (James Anderson 700 Test Wickets) अँडरसनच्या आधी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेण्याची आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यामध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांनी 800 तर ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या नावावर 708 विकेटची नोंद आहे.
700 विकेट घेण्यासाठी अँडरसनला 187 सामन्यांच्या 348 डावांचा अवधी लागला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विश्वविक्रमही अँडरसनच्या नावावर आहे. त्याने 21 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 40 हजार चेंडू टाकले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न 708 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता जेम्स अँडरसन700 बळींच्या क्लबमध्ये सामील होणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. (James Anderson 700 Test Wickets)
जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. या इंग्लिश वेगवान गोलंदाजाने वयाच्या 41 वर्षे 223 दिवसात ही कामगिरी केली.त्याच्या आधी शेन वॉर्नने वयाच्या 37 वर्षे 104 दिवसात 700 विकेट्स घेतल्या होत्या. तर मुरलीधरनने 700 विकेट्स पूर्ण केल्या तेव्हा तो वयाच्या 35 व्या वर्षी होता.
भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी अँडरसनच्या खात्यात 690 कसोटी बळी घेतले. हैदराबाद कसोटीत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंडने त्या सामन्यात एकमेव वेगवान गोलंदाज मार्क वुडला संधी दिली. इंग्लिश संघाने तो सामना जिंकून मालिकेत दमदार सुरुवात केली होती. अँडरसनला विशाखापट्टणम कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या सामन्यात त्याने एकूण 5 विकेट घेतल्या. विशाखापट्टणमनंतर, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचा पुढचा सामना राजकोट आणि रांची येथे झाला. या सामन्यात त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. राजकोटमध्ये अँडरसनला फक्त 1 बळी मिळाला, तर रांचीमध्ये त्याने 2 बळी घेतले. धर्मशाला कसोटीत शुभमन गिल आणि कुलदीप यादवला बाद करत त्याने कसोटी क्रिकेटमधील 700 बळी पूर्ण केले.
हेही वाचा :